आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी या प्रशालेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ या वर्षाच्या सुरुवातीला १५ जून रोजी प्रशालेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे “पुष्पवृष्टी” करून स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष हनुमंत प्रभू, संस्था सचिव वैभव जोशी, शाळा समिती अध्यक्ष तथा कार्याध्यक्ष स्वामी समर्थ मठ चंद्रकांत हडकर, पं. स. सदस्य, संस्था सदस्य व अध्यक्ष स्वामी समर्थ मठ दिपक सुर्वे, स्वामी समर्थ मठ खजिनदार प्रफुल्ल माळकर, संस्था सदस्य मनोहर वायंगणकर, समृद्धी दुखंडे, मुख्याध्यापक डी. जे. टकले, शिक्षक वर्ग व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमा मध्ये इ. ५ वी ते १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना समृद्धी दुखंडे व माजी विद्यार्थी संघ मुंबई यांच्या वतीने देण्यात आलेल्या वह्यांचे व इ. ९ वी, इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. शिक्षक वर्गाकडून नवागत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. तसेच श्री स्वामी समर्थ मठ वायंगणी यांच्या वतीने कु. गौरवी भरत लब्दे व कु. पियुष भरत लब्दे या दोन विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले व इ.10 वी तील हुशार व होतकरू अशा दोन विद्यार्थ्यांचा वर्ष भरतील होणारा संपूर्ण शैक्षणिक खर्च देण्याचे जाहीर करण्यात आले. समृध्दी दुखंडे यांनी आपल्या मनोगतातून मुलांशी संवाद साधून समाधान वाटल्याचे स्पष्ट केले. आम्ही जरी कामानिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात असलो, तरी आज आमच्या गावच्या शाळेतील मुलांना शैक्षणिक मदतीचा हात देता आला याचा गर्व वाटतो. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत न्यावा अशा शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतात प्रभू यांनी शालेय विकासात्मक गोष्टींचा उल्लेख केला. शालेय वातावरण मुलांना पोषक कसे राहील हे संस्था म्हणून आम्ही काम पार पाडणार आहोत. या शैक्षणिक उठावासाठी सर्व पालकांनी, ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन व आभार प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. केतकी बावकर यांनी मानले.










