चिरेखाणीवर झालेल्या डंपर अपघातात चालकाचा दुर्दैवीरीत्या मृत्यू

भाऊबीजे दिवशी कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर /चाफेखोल गाव हळहळला

चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चाफेखोल सडा येथील चिरेखाणीवर चिरेखाणीचा काही भाग मातीच्या भरावाने बुजविण्याचे काम सुरु असताना डंपर रिव्हर्स घेताना पलटी होऊन झालेल्या अपघातात डंपर चालक सुरज सोनु वायंगणकर (२२) रा. चाफेखोल वायंगणकरवाडी हा युवक जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची खबर मिळताच मालवण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेण्यात आला. शवविच्छेदन मालवण ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. पुढील कार्यवाही पोलीस ठाणे येथे सुरु होती.

मालवण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय धोंडी नाईक यांच्या चिरेखाणीवर गेले काही महिने सुरज सोनु वायंगणकर हा युवक धनंजय नाईक यांच्या डंपरवर (एम. एच. ०७. एक्स. ०२०४) कार्यरत होता. खाणीवरील चिरे काढलेल्या काही भागात गुरुवारी सकाळी भराव टाकण्याचे काम सुरु होते. या दरम्यान, डंपर मागे घेत असताना डंपर पलटी झाला. यात सुरज याच्या अंगावर डंपर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत खनिवारील कामगारांकडून पोलीसांना माहिती देण्यात आली.पोलीस निरीक्षक मारुती जगताप, उपनिरीक्षक संदिप खाडे,हेड कॉन्स्टेबल प्रकाश मोरे,अजय येरम, सद्दामहूसेन मुल्ला आदी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला. मालवण ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान याप्रकरणणी पुढील कार्यवाही सुरु होती.

भाऊबीजेच्या दिवशी चाफेखोल गावावर शोककळा

चाफेखोल येथील सोनू वायंगणकर यांचा सूरज हा एकुलता एक मुलगा वडील चालक असल्याने सुरजही महाविद्यालयीत शिक्षण पुर्ण करुन काही महिन्यांपासून चिरेखाणीवर डंपर चालक म्हणुन कार्यरत होता. आज भाऊबीज असल्याने कुटुंबियांनी आज जाऊ नको असे सांगुनही तो कामावर गेला होता असे तेथील ग्रामस्थांकडून सांगण्यात येत होते मात्र त्याचे अनपेक्षित दुर्दैवी अपघातात निधन झाले. सुरज याची घरची परिस्थिती बेताची आहे. त्याच्या पश्चात आई वडील,बहीण असा परिवार आहे. अपघाताची खबर कळताच संपूर्ण चाफेखोल कुणकावळे गावातील ग्रामस्थ,मित्रपरिवार, आमडोस, चौके गावातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली.
सुरज हा हुशार मनमिळावू असल्याने सर्वत्र परिचित होता. त्याच्या अकाली दुर्दैवी निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!