खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कणकवली तालुक्यातील साळीस्ते या गावी महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने बांधण्यात आलेल्या एस टी बस थांब्याला बौद्धवाडी साळीस्ते असे नाव दिल्याबद्दल येथील ग्रामस्थांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की,मुंबई – गोवा महामार्गावरील साळीस्ते बौद्धवाडी हा पूर्वी पासून एस टी बस थांबा होता.परंतु या इथे प्रवाशांच्या सोयीसाठी कायमस्वरूपी प्रवासी शेड उपलब्ध नव्हती.त्यामुळे ग्रामस्थाना महामार्गावरच ऊन वारा पावसात एस टी बस साठी उभे रहावे लागत होते. याबाबत साळीस्ते बौद्धावाडी येथील स्थानिक मंडळाचे माजी अध्यक्ष श्री विजय बाबू कांबळे,माजी सचिव श्री गिरीश गणपत कांबळे,सहसचिव श्री वैभव विजय कांबळे,यांसह ग्रामस्थानी दोन वर्षापूर्वी आंदोलन करून सदर ठिकाणी कायमस्वरूपी प्रवासी शेड व एस टी बस थांब्याला बौद्धवाडी साळीस्ते असे नाव देण्याची मागणी केली होती.
अखेर साळीस्ते बौद्धवाडी येथील ग्रामस्थांच्या मागणीला यश आले असून मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने नुकताच येथे आर सी सी सिमेंट काँक्रीटचा कायमस्वरूपी मजबूत बस थांबा अर्थात प्रवासी निवारा शेड रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधण्यात आला असून या बस थांब्याला बौद्धवाडी साळीस्ते असे नाव देखील प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आले आहे.याबद्दल साळीस्ते बौद्धवाडी ग्रामस्थांच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.














