दि. ६ व ७ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयात शिबिराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शासन आपल्यादारी’ या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत नरडवे प्रकल्पातील शिल्लक निवाडा रक्कम मोबदला वाटपासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. ६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, नरडवे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्र. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बालाजी शेवाळे यांनी कळविले आहे.
सदर शिबिरामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांना अद्याप त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळालेली नाही, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शिबिरादरम्यान शिल्लक भरपाई रकमेचे मोबदले देण्यात येणार असून, मोबदल्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत.
मोबदला मिळविण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे :
१. मोबदलाधारकाचा अर्ज किंवा मोबदलाधारक मयत असल्यास त्यांच्या वारसांचा अर्ज.
२. १८९४ च्या भूमिअधिग्रहण अधिनियमाच्या कलम १२(२) अंतर्गत मिळालेल्या नोटीसीची मूळ प्रत.
३. पोलीस पाटील यांच्याकडून जारी रहिवासी दाखला.
४. खातेदार मयत असल्यास मृत्यू दाखला.
५. वारसा रजिस्टर उतारा (गाव नमुना नं. ६क व ९).
६. कोणत्याही न्यायालयात मालमत्तेसंबंधी वाद असल्यास संबंधित नोटीसा व त्याबाबतचे तपशील.
७. नुकसान भरपाईची रक्कम यापूर्वी घेतली असल्यास/नसल्यास त्याची खात्री करणारे प्रमाणपत्र.
८. वाद नसल्यास विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र कार्यकारी दंडाधिकारी यांच्या समोर पूर्ण केलेले जोडणे आवश्यक.
९. मोबदलाधारक मयत असल्यास सर्व वारसांचे एकत्रित प्रतिज्ञापत्र आवश्यक.
१०. क्षतिपूर्ती बंधपत्र (₹100 च्या बाँड पेपरवर).
११. स्वघोषणापत्र (साध्या कागदावर).
१२. शिधापत्रिका, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, Cancelled कोरा चेक.
१३. बँकेकडून प्रमाणित विहित नमुन्यातील फॉर्म, शिक्का व स्वाक्षरीसह.
१४. लाभार्थी व साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फोटो.
१५. आधारकार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक (OTP साठी).
१६. बँक मॅनेजरकडून प्रमाणित पासबुक छायांकित प्रत.
१७. वर्ग २ बोजा असल्यास नाहरकत प्रमाणपत्र.
१८. नाव/आडनाव बदल झाल्यास शासन राजपत्रातील बदलाची प्रत.
प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करून शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या विशेष उपक्रमाद्वारे नरडवे प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या प्रलंबित मोबदल्याचा लाभ मिळणार असून शासन आपल्यादारी मोहिमेअंतर्गत जनतेपर्यंत थेट सेवा पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे.












