कविता शिंपी यांना पुन्हा शिक्षणाधिकारी पदावर रुजू करून घेण्याचे आदेश

ओरोस (प्रतिनिधी) : पूर्व परवानगी शिवाय वैद्यकीय रजेवर जाऊन शिस्तभंगाच्या कारवाईमुळे कार्यमुक्त करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांना पुन्हा शिक्षणाधिकारी पदावर हजर करून घेण्याचे आदेश शासनाचे उपसचिव यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांना दिले आहेत.

माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्या विरोधात विधानसभेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून त्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर हजर करून घेण्यात आले नव्हते. त्यांनी वैद्यकीय रजा घेतली होती. मात्र या कालावधीत प्रभारी माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून श्री पाटील यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता. त्या वैद्यकीय रजेनंतर पुन्हा शिक्षणाधिकारी पदावर रुजू होण्यासाठी आल्या होत्या. मात्र त्यांना हजर करून घेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी दाद मागितली होती.

त्यानुसार राज्याच्या उपसचिवांनी कविता शिंपी यांना शिक्षणाधिकारी पदावर रुजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या कारवाईला अखेर केराची टोपली वरिष्ठ स्तरावरून दाखवण्यात आली आहे.

error: Content is protected !!