सरदार पटेल जयंतीनिमित्त सिंधुदुर्गात होणार ‘युनिटी मार्च’ — तरुणांच्या सहभागाने देशभक्तीचा जागर

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त केंद्र सरकारच्या युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय, माय भारत द्वारे सरदार @150 युनिटी मार्च सुरु करण्यात आला आहे. ३१ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत या अंतर्गत देशभर विविध कार्यक्रम राबविले जाणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. आठ ते दहा किमी अंतराची पदयात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये किमान ५०० युथ सहभागी होतील, अशी अपेक्षा असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मेरा युवा भारतचे उपसंचालक कालिदास घाटवळ, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ, एन. सी. सी. चे हितेश कुमार, एन. एस. एस. चे धोंडू गावडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी, या उपक्रमाचा उद्‌देश तरुणांमध्ये राष्ट्रीय अभिमान निर्माण करणे, सामाजिक जबाबदारी वाढवणे आणि एकतेची भावना बळकट करणे आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसहभागातून राष्ट्र उभारणीच्या इष्टीकोनातून प्रेरित आहे. या कार्यक्रमात, तरुणांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण देशाच्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीत आपली भूमिका बजावण्यासाठी एकत्र येवू शकतात. विशेषतः यातून अमृत पिढीच्या म्हणजेच आजच्या तरुणांच्या भूमिकेकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

या उपक्रमाचा एक भाग म्हणून, मंत्रालयाने ६ ऑक्टोबर, २०२५ रोजी सरदार @150 युनिटी मार्च सुरु केला आहे. हा भारत सरकार आणि माय भारत यांचा उपक्रम आहे, जो भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीला समर्पित आहे. या देशव्यापी कार्यक्रमाचे उद्‌दिष्ट तरुणांमध्ये एकता, देशभक्ती आणि कर्तव्याची भावना निर्माण करणे आहे. सरदार पटेल यांनी ज्याप्रमाणे विखुरलेल्या भारताला एक केले, त्याप्रमाणे ही पदयात्रा भारताच्या एकीकरणाच्या भावनेला पुढे नेईल. ही मोहीम तरुणांना अखंड भारत आणि स्वावलंबी भारताचे आदर्श स्वीकारण्यात प्रेरित करेल. ६ ऑक्टोबर रोजी केंद्रीय युवा कार्यक्रम व खेळ मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मध्य भारत पोर्टलवर ही मोहीम डिजिटली सुरु केली आहे. या टप्प्यात, सोशल मिडिया रील स्पर्धा, निबंध लेखन आणि सरदार @150 यंग लीडर्स प्रोग्रामचा समावेश आहे. या टप्प्यात, सरदार @150 यंग लीडर्स प्रोग्राममधील १५० विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.

असे राहणार अभियान
जिल्हास्तरीय पदयात्रा (३१ ऑक्टोबर – २५ नोव्हेंबर २०२५) प्रत्येक संसदीय क्षेत्रातील सर्व जिल्हांमध्ये १ दिवसांची ८-१० किमी लांबीची पदयात्रा असेल. पदयात्रेपूर्वी स्थानिक लोकांमध्ये वातावरण निर्माण करण्यासाठी शाळा आणि महावि‌द्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, सरदार पटेल यांच्या जीवनावरील चर्चासत्र, पथनाट्ये असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. यासोबतच, इग्जमुक्त भारताची प्रतिज्ञा, संस्थामध्ये स्वदेशी मेळावे आयोजित करणे, “गर्वाने स्वदेशी” अशी प्रतिज्ञा देखील तरुणांमध्ये घेतली जाणार आहे. तसेच या काळात, योग आणि आरोग्य शिबिरांसोबत, परिसरात स्वच्छता मोहीम देखील आयोजित केली जाईल. पदयात्रे दरम्यान सरदार पटेल यांच्या पुतळ्याला/चित्राला आदरंजली, आत्मनिर्भर भारताची प्रतिज्ञा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रमाणपत्र वितरण होणार आहे. कॅबिनेट मंत्री, खासदार, स्थानिक प्रशासन, माय भारत आणि एन. सी. सी., एन. एस. एस. अधिकारी या यात्रेचे नेतृत्व करतील. राष्ट्रीय पदयात्रा (२६ नोव्हेंबर – ६ डिसेंबर २०२५) करमसद ते केवहिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत १५२ किमी लांबीची पदयात्रा आयोजित केली जाणार आहे.

जिल्ह्यातील पदयात्रा मार्गावरील गावांमध्ये सामाजिक विकास कार्यक्रम असतील. ज्यामध्ये माय भारत, एन. सी. सी. चे स्वयंसेवक, एन. एस. एस. कॅडेट्स आणि युवा नेते सहभागी होतील. सरदार पटेल यांच्या जीवनावर आणि भारताच्या विविध संस्कृतीचा उत्सव साजरा करण्यासाठी विकसित भारत प्रदर्शन १५० थांब्यावर आयोजित केले जाईल. दररोज संध्याकाळी सरदार गाथा होईल, ज्यामध्ये पटेल यांच्या जीवनाचे आणि योगदानाचे कथन केले जाईल, असे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले.

सर्व नोंदणी आणि उपक्रम माझे भारत पोर्टलवर होत आहेत. या पोर्टलवर नोंद करून जिल्ह्यातील तरुणांना या ऐतिहासिक उपक्रमात सामील होण्याचे आणि सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नोंदणी केल्याशिवाय उपक्रमात सहभाग नोंदविता येणार नाही. या उपक्रमात नागरिकांचा सहभाग मिळण्यासाठी राज्य शासनाने महेश सारंग – सावंतवाडी, प्रकाश गोगटे – देवगड, सुमित सावंत – मालवण आणि हेमंत गावडे – वेंगुर्ले यांची निवड केली आहे.

error: Content is protected !!