युवतीच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार – नातेवाईकांचा आरोप

मृतदेह ताब्यात न घेण्यावर ठाम

वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे भूतेश्वरवाडी येथील तरुणीचा बुधवारी सायंकाळी आकस्मित मृत्यू झाला आहे. सुंदरा प्रकाश शिवगण (वय 25) असे या तरुणीचे नाव आहे. रुग्णवाहीका व उपचार वेळेत मिळाले नसल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. जोपर्यंत संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा तिचे नातेवाईक व उंबरडे ग्रामस्थांनी घेतल्यामुळे ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे तणावाचे वातावरण तयार झाले होते.

मयत सुंदरा शिवगण हिला बुधवारी दुपारी उलट्यांचा त्रास होऊ लागल्याने तिचे वडील प्रकाश व आई यांनी तिला दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल केले होते. डॉक्टर आणि तिला सलाईन लावले परंतु तिची तब्येत अधिकच खालावत चालल्यामुळे तिला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे हलवण्यास डॉक्टरांनी सांगितले. मात्र ओरोस येथे हलवण्यासाठी दोन-अडीच तास होऊनही 108 नंबरची ॲम्बुलन्स उपलब्ध झाली नाही तर 102 नंबरची रुग्णवाहिकेमध्ये डिझेल नसल्याचे यंत्रणे कडून सांगण्यात आले. यादरम्यान तरुणीची तब्येत अधिकच खालवत चालल्यामुळे नातेवाईकांनी तिला खाजगी वाहनातून हलवण्याचा निर्णय घेतला. खाजगी वाहनातून ओरोसला नेत असताना वैभववाडी पासून सहा किमी अंतरावर खंबाळे येथे वाटेतच या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. यावेळी प्रमोद रावराणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. वेळेत योग्य उपचार व ॲम्बुलन्स मिळाली नसल्यामुळेच या भगिनीचा मृत्यू झाला आहे. हा वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा आहे. त्यांच्यामुळेच या तरुणीचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर ऑन ड्युटी असताना क्रिकेट कसे खेळतात, बाजारात कसे फिरतात, इथे रुग्णांवर उपचार कोणी करायचे असा सवाल त्यांनी केला. संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत असा इशारा तिच्या नातेवाईक व उंबरे ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी उंबर्डे ग्रामस्थ किशोर दळवी, अतुल सरवटे, प्रकाश शिवगण, वासुदेव पावसकर, संतोष पांचाळ, अमित पांचाळ, पांडुरंग पांचाळ, सचिन सावंत, चंद्रकांत पांचाळ, गौरव पांचाळ, अक्षय पांचाळ आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!