मृताच्या व्हिडिओने खळबळ
सावंतवाडी (प्रतिनिधी) : दुकान लावण्यास वारंवार अटकाव केल्याचे नैराश्य आल्यामुळे बांदा येथील तरुणांनी आपल्या घरातच पहाटे गळफास लावून आत्महत्या केली आहे. आफताब कामरूद्दीन शेख (वय ३८, रा. बांदा-मुस्लिमवाडी) असे त्याचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्याने खास व्हिडिओ करून आपल्या आत्महत्येला बांदा शहरातील पाच जण जबाबदार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी बांदा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. परंतु जोपर्यंत संबंधितांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ही घटना आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्याने बांदा येथील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला खाली उतरले व बांदा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुन्हा अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात येत असताना वाटेतच त्याचे निधन झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, आफताब याचे बांदा बाजारपेठेत फुलांचे दुकान आहे. आठ महिन्यापूर्वी त्यांने फुलाचे दुकान लावताना त्या ठिकाणी असलेल्या फुलावर थुकल्याचा आरोप करतो शहरातील काही तरुणांनी त्याला दुकान लावल्यास अटकाव केला. त्यानंतर तब्बल आठ महिने त्याला व्यवसाय करायला दिला नाही. दरम्यान आता जत्रेचा सिझन चालू झाल्यामुळे त्याने पुन्हा आपले दुकान सुरू केले. मात्र त्यातील काही लोकांनी त्यांना पुन्हा व्यवसाय करू देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आपण व्यवसाय करू शकत नसल्यामुळे घरची परिस्थिती हलाखीची झाली आहे. आपल्या बायको, मुलांचे हाल झाले आहे. त्यामुळे आता माझ्यासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, माझ्या मुलांना सांभाळा अशी भावनिक हाक देते त्यांने आपला व्हिडिओ बनवला आणि पाच वाजण्याच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. काही वेळानंतर हा प्रकार घरातील व्यक्तींच्या लक्षात आला. त्यानंतर आफताब याला तात्काळ बांदा येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्या ठिकाणी अधिक उपचारासाठी त्याला सावंतवाडी रुग्णालयाचा सल्ला दिला. त्या ठिकाणी उपचार केल्यानंतर पुन्हा गोवा-बांबूळी येथे नेण्याचा सल्ला दिला. मात्र वाटेत त्याचे निधन झाले. दरम्यान या प्रकाराबाबत त्याच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याच्या आत्महत्येला बांध्यातील ते पाच जण जबाबदार आहेत. त्याने व्हिडिओ उल्लेख केल्याप्रमाणे संबंधितांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावे व त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी. जोपर्यंत त्यांना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा नातेवाईकांनी दिला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर बांधव सावंतवाडी येथील मुस्लिम धर्मियांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर दबाव आहे. वारंवार आम्ही विनवणी करून सुद्धा पोलीस दखल घेत नाही. त्यामुळे काही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. याबाबत आता त्याचा भाऊ अब्दुल रझाक याने पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, हा प्रकार नैराश्यातून घडला आहे. वारंवार संबंधित चार ते पाच जणांकडून त्याच्यावर दबाव येत असल्यामुळे त्याने हा प्रकार केला. त्यामुळे काही झाले तरी माझ्या भावाच्या आत्महत्येस कारणीभूत ठरणाऱ्या संबंधितावर कारवाई केल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी जावेद खतीब, रफिक मेमन, ॲड. समीउल्ला ख्वाजा, संदीप निंबाळकर, अल्ताफ मुल्ला, तौकीर शेख, सरफराज नाईक, जैद शेख आदी उपस्थित होते.












