वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे गावच्या भुतेवाडीतील तरुणी सुंदरा शिगवण हिला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने गावकऱ्यांनी तातडीने उपचारासाठी उंबर्डे व नंतर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात नेले. मात्र, तेथे ना अँब्युलन्स उपलब्ध होती, ना डॉक्टर, आणि औषधोपचार तर दूरचीच गोष्ट होती. या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या घटनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप सरवणकर यांनी शासनावर थेट हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटलं आहे की – “आमच्या लाडक्या बहिणीचा बळी घेतलेल्या शासनाने याची जबाबदारी घ्यावी. कारण आता तर ना ‘देवा’वर विश्वास आहे, ना ‘नाथा’वर!”
सरवणकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, वैभववाडी रुग्णालयात केवळ रुग्णांना जिल्हा रुग्णालयात किंवा कणकवली, ओरस येथे पाठविण्यासाठीच स्टाफची नेमणूक केली आहे का? तिथे प्रत्यक्ष उपचाराची जबाबदारी कोणाची?
ते पुढे म्हणाले की, “एका तरुण जीवाच्या दुर्दैवी घटनेवर सरकारने फक्त कार्यकर्ते पाठवून प्रसंग निभावण्यापेक्षा जबाबदार आरोग्य अधिकारी, संबंधित पालकमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांवर कारवाई केली पाहिजे. अन्यथा हे सरकार स्वतःला रामशास्त्रींचे वारसदार म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार राखून ठेवू शकत नाही.”
सरवणकर यांच्या या तीव्र शब्दांतून वैभववाडी आरोग्य यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या संवेदनहीनतेबद्दल लोकांमधील असंतोष स्पष्ट दिसून येतो.












