ओरोस (प्रतिनिधी) : अनधिकृतपणे घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कुडाळ तालुक्यातील घोटगे मळेवाडी येथील सचिन राजाराम भामट वय ३१ वर्षे याला तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश १ सूर्यकांत इंदलकर यांनी दोन वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षाच्यावतीने सरकारी अभियोक्ता रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
फिर्यादी ही आपले राहते घरातील जेवणाचे खोलीतील ओट्यावरील गॅसवर जेवण बनवित होती. यावेळी आरोपीने फिर्यादी यांचे घरात अनधिकृतपणे प्रवेश करून त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणी ३१ मे २०२५ रोजी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. विविध तिनं कलमाखाली सचिन भामट याला दोषी ठरवीत शिक्षा सुनावली आहे. तिन्ही मधील एकत्रित शिक्षा म्हणून दोन वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड त्याला भोगावा लागणार आहे.
तपासिक अधिकारी म्हणून पोलिस हवालदार एम वाय जाधव यांनी काम पाहिले. न्यायालयाने एकूण पाच साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, उत्तम मुकुंद वाडकर, शुभांगी शंकर सूद, मारुती तुकाराम सूद, पोलीस हवालदार मंगेश जाधव यांचा समावेश आहे.









