समाजसेवक संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांना ‘समाज गौरव पुरस्कार–२०२५’ प्रदान

कोकण एनजिओ इंडिया कडून दादरच्या स्वातंत्र्यवीर स्मारकात जेष्ठ अभिनेते अविनाश नारकर यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान

आई-वडिलांची, आजी-आजोबांची काळजी घ्या; अन्न वाया घालवू नका. — संदिप परब यांचे आवाहन

खारेपाटण (प्रतिनिधी) : “प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील ज्येष्ठांची प्रेमाने काळजी घेतली पाहिजे. आई-वडील, आजी-आजोबा हे आपल्या संस्कृतीचे मूळ आहेत. तसेच अन्न ही आपल्या श्रमाची आणि निसर्गाची देण आहे; त्याचा अपव्यय होऊ नये,” असे भावपूर्ण उदगार जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप लावण्यवती प्रभाकर परब यांनी मुंबई, दादर येथे कोकण एनजीओ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या समाज गौरव पुरस्कार – २०२५ वितरण सोहळ्यात मार्गदर्शन करताना काढले.

संदीप परब हे रस्त्यावरील निराधार आणि वंचित बांधवांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने कार्य करत असून त्यांच्या समाजसेवेच्या कार्याची दाखल घेत कोकण एनजीओ इंडिया तर्फे मुंबई, दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक येथे नुकताच त्यांना ‘समाज गौरव पुरस्कार–२०२५’ प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेते अविनाश नारकर यांचे शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या प्रसंगी पद्मश्री मुरलीकांत पेटकर (जागतिक कीर्तीचे पॅरालिंपिक जलतरणपटू), कोकण एनजीओ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष दयानंद कुबल, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान संरक्षण क्षेत्र, ग्रामीण विकास, कला-संस्कृती, आरोग्य, युवा उद्योजकता आणि समाज प्रबोधन अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कोकण एनजीओ इंडिया ही संस्था देशभरातील वंचित घटकांच्या शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे.

या संस्थेच्या वतीने दादर येथे ‘कोकण कला महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता,ज्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान सोहळा पार पडला. तर जीवन आनंद संस्था ही रस्त्यावरच्या निराधार बांधवांसाठी पुनर्वसन, अन्नदान, तसेच मानसिक आरोग्य जनजागृती यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

या कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त किसन चौरे आणि स्वयंसेवक शैलेंद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. “समाजसेवा हीच खरी पूजा आहे. ज्येष्ठांचा सन्मान आणि अन्नाचे जतन – हाच माझा ‘जीवन आनंद’ आहे.” असे यावेळी समाजभूषण पुरस्कार प्राप्त संदिप परब यांनी सांगितले.

error: Content is protected !!