२० तोळे सोने, ३ लाख रुपये रोख रक्कम लंपास
कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली गडगेवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या धाडसी घरफोडीत चोरटे सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने, काही चांदीचे दागिने आणि सुमारे ३ लाख रुपये रोकड असा लाखो रुपयांचा ऐवज चोरी करून फरार झाले आहेत.
ही घटना मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील विनायक दळवी हे कुटुंबासह भात कापणीसाठी शेतात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी केली. दळवी कुटुंब परतल्यानंतर घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश केला असता कपाटे उघडी व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेले आढळले. तपासणी केली असता सोनं, चांदी आणि रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये, पोलिस पाटील सारिका कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच कणकवली पोलिसांनी तातडीने जागेवर दाखल होऊन पंचनामा केला आणि तपास सुरू केला आहे. या दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे.











