जि. प. प्राथमिक शाळा भोगलेवाडी येथील आपत्ती व्यवस्थापनचे सुरू असलेले अयोग्य बांधकाम ग्रामस्थांनी रोखले

चौके ( प्रतिनिधी) : जि. प. प्राथमिक शाळा भोगलेवाडी येथील मैदानावर जिल्हा परिषद आपत्ती व्यवस्थापन विभागाने गेले चार दिवस नवीन इमारत बांधणीसाठी खोदकामाला सुरुवात केली होती. मात्र स्थानिक पालक, ग्रामस्थ माजी विद्यार्थी यांनी शाळेच्या मैदानावर जाऊन पाहणी केली असता चालू असलेले काम हे अयोग्य असल्याने तात्काळ ठेकेदाराला काम थांबवण्याची विनंती केली.

भोगलेवाडी येथील शाळा हि इयत्ता पहिली ते चौथी वर्ग सुरू असलेली शाळा असून या शाळेत भोगलेवाडी, खेरवंद, बागायत, बाळोजीची वाडी, आवळदेवाडी, मुणगेकरवाडी अशा वेगवेगळ्या गावातून वाडीतून विद्यार्थी येतात. या शाळेला आवश्यक तेवढे मैदान तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. असे असताना मुलांना खेळण्यासाठी आवश्यक मैदानात जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी कोणताही विचार न करता तसेच ग्रामस्थ पालक यांची संमती न घेता किंवा ग्रामसभेचा कोणताही ठराव न घेता मनमानी करत आपत्ती व्यवस्थापनासाठी इमारत बांधण्यासाठी खोदकामाला सुरुवात केली होती.

महत्त्वाची बाब म्हणजे हे काम सुरू असताना शाळेला दिवाळीची सुट्टी होती आणि अशा वेळेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वाळके यांच्या गैरजरीत सदर काम सुरू होते तसेच जिल्हा परिषद विभागाचा कोणीही अधिकारी किंवा कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नव्हता.

यापूर्वी शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांच्या सभेमध्ये तातू भोगले यांनी मैदानावर अशी इमारत होऊ नये यासाठी विरोध दर्शवला होता व पर्यायी अंगणवाडी शेजारी जागा दाखविली होती मात्र अधिकाऱ्यांनी आपली मनमानी करून शाळेचा तसेच विद्यार्थ्यांचा त्यांच्या भविष्याचा विचार न करता इमारत परस्पर मंजूर करून बांधकामाला सुरुवात केली होती. मात्र भोगलेवाडी येथील जागरूक ग्रामस्थ व माजी विद्यार्थी उमेश भोगले यांनी मैदानावर जाऊन पाहणी करून सुरू असलेले काम रोखले तर बागायत येथील सुरज धामापूरकर यांनी सोशल मीडियावरून माजी विद्यार्थी यांच्याशी संदेश स्वरूपात जागरूकता दाखवून बांधकामाची माहिती दिली.
लागलीच तातू भोगले, सूरज धामापूरकर, निलेश खोत, सचिन धामापूरकर, गणेश भोगले, प्रवीण कवठणकर, अंशूण गावडे, अविनाश मुणगेकर यांनी एकत्र येऊन कामाची पाहणी केली आणि ठेकेदाराने नेमलेल्या इंजिनिअरशी कामाची विचारपूस केली असता शाळा समिती अध्यक्षाचे नाव पुढे करण्यात आले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्युत मीटर वापरण्यास परवानगी दिली असे स्पष्ट केले. मात्र जमलेल्यानी तत्काळ काम थांबवण्यास भाग पाडले. हि शाळा आहे, आम्हाला या जागेत अशी इमारत गरजेची नसून शासनाने इतर कोणत्याही ठिकाणी हि इमारत बांधावी असा पवित्रा उपस्थितांनी घेतला.

जो पर्यंत संबंधित अधिकारी या ठिकाणी येत नाही तोपर्यंत काम सुरु करू नये असा इशारा दिला. या सर्व प्रकारात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला असून जिल्हा परिषद अधिकाऱ्याने तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तोडगा काढणे आवश्यक आहे. कारण ठेकेदाराने खोदलेला खड्डा हा फारच मोठा आहे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठेकेदाराने कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही. खरे पाहता असे काम करत असताना सुट्टीच्या कालावधीत करणे आवश्यक होते. तसेच पत्र्याचा वापर करून चारही बाजूंनी जागा बंदिस्त करून घेणे आवश्यक होते मात्र तसे केलेले नाही. संपूर्ण परिसरात लोखंडी सळ्यांचा पसारा करून ठेवलेला आहे. शाळेची मुले कुतुहलाने काम पाहण्यासाठी पुढे पुढे गेल्यास फार मोठा अनर्थ होण्याचा धोका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थी फारच आक्रमक झालेले आहेत.

error: Content is protected !!