पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ऐतिहासिक निर्णय
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्या व २५ रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. असा निर्णय घेणारा राज्यातील सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा आहे. याचा मला अभिमान आहे .सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने कायम पहिल्या क्रमांकावर ठेवण्याचे माझे प्रयत्न आहेत. असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी आजच्या सत्कार कार्यक्रमात केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वर्षापासून वाडी वस्त्यांना व रस्त्यांना असलेली जातीवाचक नावे बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्गच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .
सिंधुदुर्गनगरी येथील कै बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्गचे अध्यक्ष महेश परुळेकर, जिल्हा संघटक अंकुश जाधव, संघटनेचे सचिव रमाकांत जाधव, गौतम खुडकर ,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्या व २५ रस्त्यांची जाती वाचक नावे बदलण्याचा निर्णय घेतला. यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .यावेळी जिल्ह्यातील वाडी वस्त्यांची जातीवाचक नावे बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करणाऱ्या सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित सरपंच, नगरसेवक यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रमाकांत जाधव यांनी संविधानिक हितकारणी महासंघ सिंधुदुर्ग या संघटनेची स्थापना तीन वर्षांपूर्वी करण्यात आली असून समाजाच्या हितासाठी कार्यरत आहे . यापुढेही कार्यरत राहील असे स्पष्ट केले तर संघटनेचे अध्यक्ष महेश परुळेकर यांनी बोलताना अनेक मुद्दे उपस्थित केले पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने रस्ते व वस्त्यांना असलेली जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय झाला आहे .त्यामुळे त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आमच्या समाजाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यापैकी एक असलेला जातीवाचक नावे बदलण्याचा निर्णय झाला आहे. आता १९९० मध्ये धर्मांतरीत झालेल्या नव बौद्ध बांधवांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत असे सांगितले.
यावेळी सत्कारानंतर बोलताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जातीवाचक नावे असलेल्या १९२ वस्त्या व २५ रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मला योगदान देता आले याचा आनंद आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व सार्वजनिक बांधकाम अभियंता अजय कुमार सर्व गोड यांचेही योगदान महत्त्वाचे आहे. आजचा हा कार्यक्रम सिंधुदुर्गच्या इतिहासात नोंद करण्यासारखा आहे जातीवाचक नावे बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा राज्यातील सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा आहे आणि तो माझा जिल्हा आहे याचा मला अभिमान आहे. सिंधुदुर्ग जिल्हा विकासाच्या दृष्टीने कायम पहिला नंबर वर राहावा यासाठी माझे प्रयत्न आहेत. माझा येथे कोणीही शत्रू नाही जिल्ह्याच्या हितासाठी मी सर्वांशी संवाद साधतो. मला जिल्ह्याचा विकास करायचा आहे जिल्ह्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचला पाहिजे हे माझे कायम प्रयत्न राहतील. सर्व कुटुंबाला आकार देण्याचे काम राज्य सरकारच्या माध्यमातून केले जाईल. सिंधुदुर्गातील जातीवाचक नावे असलेल्या वस्त्या व रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यभर राबविन्याची तयारी करीत आहे.असेही यावेळी राणे यांनी स्पस्ट केले












