महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांचा शिंदे गटात प्रवेश
दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील महिला तालुका प्रमुख श्रेयाली गवस यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे दोडामार्ग तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) अधिक बळकट झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजू परब, तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उपजिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, शैलेश दळवी, तसेच तालुका संघटक गोपाळ गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रेयाली गवस यांच्या प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेनेला (शिंदे गट) मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. या वेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले, “कार्यक्षम नेतृत्वाला पक्षात सदैव योग्य स्थान मिळेल. श्रेयाली गवस यांचा अनुभव आणि कार्यकौशल्य पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल.”
या कार्यक्रमाला उपतालुका प्रमुख दादा देसाई, भगवान गवस, रामदास मेस्त्री, बबलू पांगम, बाळा नाईक, विनायक शेट्ये, विशांत तळवडेकर, संजय गवस, सज्जन धाऊसकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












