उंबर्डे देवस्थान विश्वस्त मंडळात सर्व वाड्यांच्या प्रतिनिधींना स्थान द्यावे – सह धर्मादाय आयुक्तांचा आदेश

वैभववाडी (प्रतिनिधी) : उंबर्डे येथील श्री महालक्ष्मी रामेश्वर चव्हाटा रवळनाथ गांगेश्वर पंचायत देवस्थान न्यासाच्या विश्वस्त मंडळात गावातील सर्व वाड्यातील प्रतिनिधींचा समावेश करावा, असे आदेश कोल्हापूर येथील सह धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. या देवस्थानाच्या यापूर्वी स्थापन झालेल्या वंशपरंपरा असलेल्या न्यासाच्या विरोधात ग्रामस्थांनी धर्मादाय आयुक्तांकडे अपील दाखल केले होते, अशी माहिती उंबर्डे ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली. सह धर्मादाय आयुक्तांच्या या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

उंबर्डे येथील साडेतीनशे वर्षांपूर्वीचे माता महालक्ष्मी देवीचे मंदिर आहे. आज पर्यंत सर्व भाविकांच्यावतीने येथील वार्षिक त्रिपुरी पौर्णिमा, निशान, नवरात्र उत्सव, इत्यादी उत्सव गुण्यागोविंदाने चालत आले आहेत. परंतु येथील काही मानकरी लोकांनी माता महालक्ष्मी देवीचे मंदिर ही आपली वंशपरंपरागत मालमत्ता असल्याचे ठरवून तसा धर्मदाय आयुद्धांकडे न्यास बनवला आहे. त्यासाठी उंबर्डे येथील बारा वाड्यातील 49 लोकांची सभा घेऊन व त्या लोकांना फक्त आम्ही या मंदिराचा जिर्णोद्धार करीत आहोत व त्यासाठी प्रत्येक कुटुंबामागे 10 हजार रुपये घ्यावेत, असा ठराव संमत करून घेतला. परंतु त्या सभेत आम्ही न्यास बनवत आहोत व तो आम्हा तीन लोकांची वंशपरंपरागत मालमत्ता आहे असे सांगितले नव्हते. गावच्या स्थानिक लोकांचा विश्वासघात करून येतील पूजा आर्चा करणाऱ्या लोकांनी स्वतःची परंपरागत मालमत्ता असल्याचे नमूद करून न्यास बनवला व तसे न्यासाच्या घटनेत नमूद केले आहे. जेव्हा ही घटना काही लोकांच्या वाचनात आली तेव्हा त्याने उंबर्डे गावच्या बारा वाडीतील ग्रामस्थांचा कसा विश्वासघात केला आहे व स्वतःच्या नावावर वंशपरंपरा हा शब्द वापरून न्यास बनवला आहे हे उघड झाले आहे. तेव्हा काही ग्रामस्थांनी त्यांच्याशी चर्चा व पत्रव्यवहार करून या विषयावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या तिघांनी त्या बिलकुल उत्तर दिले नाही. त्यामुळे शेवटी नाईलाजाणे काही ग्रामस्थ कोर्टात गेलो, कोर्टात दोन्ही पक्षाच्या वकिलांनी आपली बाजू मांडली व सह धर्मदाय आयुक्त कोल्हापूर यांनी 17 ऑक्टोबर रोजी निकाल दिला आहे. त्या निकालात त्यांनी स्पष्टपणे व वंशपरंपरागत न्यास नामंजूर केला व पब्लिक ट्रस्ट सार्वजनिक ट्रस्ट असावा असे नमूद केले आहे. तसेच बारा वाड्यातील प्रतिनिधींना त्याचे स्थान द्यावे व तो सुधारणा करावा असे स्पष्टपणे नमूद केले आहे. हा लोकशाहीचा व सर्वसामान्य ग्रामस्थांचा मोठा विजय आहे. अंधश्रद्धा व अज्ञानाच्या पायी काही लोकांनी माता लक्ष्मी देवीला स्वतःच्या वंशपरंपरागत शब्द वापरून बंदिस्त केले होते. त्यातून न्यायालयाने ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने मुक्त केले आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले. यावेळी परशुराम शिरसाट, सूर्यकांत मुद्रस, संतोष नारकर, चंद्रकांत तावडे, प्रभाकर पावसकर, विजय पांचाळ, विनोद पांचाळ, किशोर दळवी, वसंत सोनाळकर, गणेश पाटणकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!