कणकवली (प्रतिनिधी) : दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना शाळेत असतानाचे ते दिवस पुन्हा अनुभवता यावेत, ते खेळ, ती दंगा मस्ती करता यावी यासाठी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आजी आजोबांच्या बालवाडी उपक्रमाचा शुभारंभ बालवाडीच्या शिक्षिका उज्वला लोके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.
वृद्धापकाळ म्हणजे दुसरे बालपण असते. याच बालपणात शाळेत अनुभवायचे दिवस पुन्हा या दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना अनुभवता यावेत यासाठीच ‘आजी आजोबांची बालवाडी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपल्या लहानपणीचा बालवाडीचा पहिला दिवस ते बालवाडीतील अनेक गीते, नृत्य आणि मज्जा सगळे यावेळी अनुभवायला मिळाले. बालवाडीच्या पहिल्या दिवशी बालवाडीतील आजी आजोबांना शाळेचा गणवेश देण्यात आला. आजी आजोबांनी एका रांगेत येऊन वर्गात प्रवेश केला. त्यानंतर पहिले राष्ट्रगीत, सामुहिक प्रार्थना, बडबडगीते, चित्रकला, गोष्टी तसेच आजी आजोबांचे विविध खेळ घेण्यात आले.
आजी आजोबांची बालवाडी घेण्याचा उद्देश म्हणजे या वयोगटात आजी आजोबांनी बालवाडी उपभोगली नव्हती त्यांना बालवाडीचा आनंद काय असतो? बालवाडीत शिस्त लावली जाते व कशाप्रकारे शिक्षण दिले जाते? याचा अनुभव उपभोगण्यासाठी या बालवाडी कार्यक्रमाचे नियोजन केले गेले. या बालवाडी मुळे आजी आजोबांचा मानसिक स्वास्थही बराच बदल होतो. एक दिवसाच्या या कार्यशाळेत आजी आजोबांची मने उत्साही होत जातात. थकलेल्या जीवाला पुन्हा जोमाने लढत पुढे जाण्याची ताकद येते. या कार्यक्रमास दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचारी वर्ग, आजी आजोबा, बालवाडी शिक्षिका उज्वला लोके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.












