डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संविधान प्रास्ताविकेचे करण्यात आले सामूहिक वाचन
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघ व माता रमाबाई महिला मंडळ तसेच अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने संविधान दिन कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक अध्यक्ष भास्कर जाधव होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे संचालक विजय रावराणे व रवींद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संविधानाच्या प्रतिकृती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर संतोष कदम यांनी संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करून घेतले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने निवृत्त विस्तार अधिकारी रुचिता कदम यांचा सेवानिवृत्ती निमित्त शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक शरद नारकर, विजय रावराणे, वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे अध्यक्ष भास्कर जाधव, उपाध्यक्ष संतोष कदम, सरचिटणीस रविंद्र पवार, सहसचिव शरद कांबळे तसेच सुरेंद्र यादव, महेंद्र यादव, अमर कदम तसेच माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा व माजी समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, सचिव रुचिता कदम आदी पदाधिकारी तसेच अर्जुन रावराणे विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












