कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांनी साधला शिबिरार्थींशी संवाद
कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रम, वागदे, कणकवली आणि अनुभव शिक्षा केंद्र यांच्या मार्फत ‘नेतृत्व, संविधानिक जाणीव व पर्यावर्णीय जबाबदारी’ हे २ दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले. सकाळी १० वाजता ३५ विद्यार्थ्यांनी उपस्थिति दर्शवली. प्रथम सर्व मुलांना शिबिराबद्दल माहिती दिली गेली. त्यानंतर मुलांची ओळख करून घेतली गेली. नाष्ट्यानंतर सकाळच्या सत्राची सुरुवात काही मनोरजंनात्मक खेळांनी करण्यात आली. अनुभव शिक्षा केंद्राची माहिती सांगण्यात आली.
सकाळच्या सत्रात कोकणी रानमाणुस ‘प्रसाद गावडे’ यांनी मुलांना ‘कोकणातील पर्यावरणपूरक जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास’ ह्याबद्दल मार्गदर्शन केले. भौतिक विकास हा अशाश्वत असुन शाश्वत व पर्यावरणपूरक विकास ही येत्या पीढीची गरज असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणून घेत त्यावर देखील प्रसादने मार्गदर्शन केले. शेवटी साथी सहदेव पाटकर यांनी आभार मानून सकाळच्या सत्राची सांगता केली.
जेवणानंतर दुपारच्या सत्राची सुरुवात करण्यात आली. ह्या सत्रात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितिचे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी मार्गदर्शन केले. जादूटोणा विरोधी कायद्याबद्दल त्यांनी माहिती दिली तसेच काही प्रात्यक्षिके सादर करुन जादूटोण्या मागील सत्य उलगडुन दाखवले. ‘तरुणांनी अंधश्रद्धेच्या आहारी न जाता वैज्ञानिक दृष्टिकोण ठेवून आयुष्यात पुढे जावे’ असा संदेश सरांनी दिला. साथी सुदीप याने सरांचे आभार मानून प्रथम दिवसाची सांगता केली.
अनुभव शिक्षा केंद्रच्या ‘नेतृत्व, संविधानिक जाणीव व पर्यावर्णीय जबाबदारी’ शिबीराचा दूसरा दिवस उत्साहात पार पडला. सकाळच्या सत्रात मूलांमध्ये परस्पर संवाद वाढवण्यासाठी व एकमेकांशी ओळख होण्यासाठी काही मनोरजंक व कृतिशील उपक्रम घेण्यात आले. नाष्ट्या नंतर प्रथम सेशन घेण्यात आले. कणकवली कॉलेजचे प्राध्यापक व मुंबई यूनिवर्सिटीचे सिनेट सदस्य सोमनाथ कदम यांनी संविधानाबद्दल मुलांना माहिती दिली. ‘सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितिमध्ये युवकांनी संविधानिक मुल्यांची जपणुक करणे गरजेचे असल्याचे मत सरांनी व्यक्त केले. त्यांनी मुलांच्या संविधानाबद्दलच्या शंकांचे देखिल नीरसन केले. त्यानंतर साथी बुशरा हिने आभार प्रदर्शन करून सकाळच्या सत्राची सांगता केली.
दुपारच्या सत्रात खारेपाटण कॉलेजच्या प्राध्यापिका दर्शना पाताडे यांनी ‘युवा पीढी समोरील आव्हाने’ ह्या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. ‘मोबाइलचा वापर कमी करून मुलांनी स्वतःच्या शारीरिक व बौधिक विकासाकडे लक्ष द्यावा’ असा उपयुक्त संदेश मॅडमांनी दिला. त्याच सोबत ‘मासिक पाळी व त्या संबंधी घ्यायची काळजी’ ह्या विषयावर मुलांशी संवाद साधला. आहार, जीवनशैली तसेच वैयक्तिक स्वच्छतेचे महत्व अधोरेखीत केले. ‘मासिक पाळी विषयी मुलींनी आपल्या समस्या खुलेपणाने पालकांना सांगाव्यात व योग्यवेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा’ असेही त्या म्हणाल्या. यानंतर साथी सुदीप याने मॅडमचे आभार मानले. जेवणानंतर समारोप व प्रशस्तीपत्रक वितरण कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे निवेदन साथी बुशरा बागवान हिने केले. यावेळी गोपुरी आश्रमच्या संचलिका अर्पिता राजेंद्र मुंबरकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. ‘युवकांनी गोपुरी आश्रमला भेट द्यावी तसेच कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचे विचार व कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कार्य करावे’ अशी आशा व्यक्त केली. त्यानंतर रुपाली कदम यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
शिबीरात सहभागी मुलांमधुन मुग्धा दळवी व मंजिरी सादये तसेच साथी यज्ञेश पोकळे यांनी आपला शिबीराचा अनुभव कथन केला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते मुलांना प्रशस्तीपत्रके देण्यात आली. यावेळी गोपुरी आश्रम संचालिका अर्पिता मुंबरकर, रुपाली कदम, प्रा. दर्शना पाताडे आणि साथी सुजय, नीलम मान्यवर म्हणून उपस्थिति होते.
याप्रसंगी साथी सहदेव पाटकर यांनी अनुभव शिक्षा केंद्रची कणकवली तालुका कार्यकारणी जाहिर केली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी साथी बुशरा, सुदीप, यज्ञेश, सिद्धेश, महेश, विशाल यांनी मेहनत घेतली. गोपुरी आश्रमचे अध्यक्ष मा. डॉ. राजेद्र मुंबरकर, सचिव विनायक मैस्त्री, अनुभव शिक्षा केंद्र महाराष्ट्र राज्य समन्वयक सचिन नाचणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यानंतर आभार प्रदर्शन करून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहिर केले.












