जीवन आनंद संस्थेचा स्तुत्य उपक्रम

दिव्यांग बांधवांची केळुस समुद्रकिनारी सहल संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्था ही निराधार,वंचित व दिव्यांग बांधवांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. नुकताच या संस्थेच्या वतीने सामाजिक संवेदनशीलतेतून संस्थेच्या पणदूर (ता. कुडाळ) येथील संविता आश्रमात राहणाऱ्या १६ बांधव आणि ४ भगिनीं साठी केळुस कालवी बंदर समुद्रकिनारी विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

प्रत्त्येक व्यक्तीला सन्मानाने, आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगण्याचा हक्क मिळावा, या ध्येयातून संस्थेचं कार्य अविरत सुरू आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन येत आहे. जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे “दिव्यांग व्यक्तींना समान संधी, सन्मान आणि सक्षम जीवन देणारा समावेशक समाज तयार करणे.हा आहे. निळेशार समुद्र,मंद वाऱ्याची झुळूक आणि प्रसन्न वातावरणात सर्व दिव्यांग बांधवांनी समुद्रकिनारी फिरत,खेळत,गाणी ऐकत आणि फोटोग्राफीचा आनंद घेत या सहलीत अविस्मरणीय क्षण अनुभवले.
तर सहलीत बांधवांनी परस्परांशी मनमोकळा संवाद साधत,मुक्तपणे रममाण होण्याचा आनंद लुटला.त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा उत्साह आणि आनंदाचे उमाळे हा या उपक्रमाचा खरा यश ठरला.या सहलीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी संस्थेचे समर्पित कार्यकर्ते, सेवकवर्ग तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी मनापासून परिश्रम घेतले. दिव्यांग बांधवांना बाहेरच्या जगाचा प्रत्यक्ष अनुभव देत त्यांच्या आत्मविश्वासात भर घालणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

जीवन आनंद संस्थेच्या या प्रयत्नाचे सर्वत्र कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे समाजात मानवी मूल्यं, संवेदनशीलता आणि परस्पर जिव्हाळा अधिक दृढ होत असल्याचे स्थानिकांनी मत व्यक्त केले. सहलीच्या आयोजनात संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांचेसह भक्ती परब, नरेश आंगणे, प्रसाद आंगणे, सुवर्णा कोकरे, प्रतिक्षा सावंत यांची महत्वाची भूमिका राहिली.

error: Content is protected !!