सरकारी वकील रपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गाडीने ठोकरने आणि दगड मारून कारचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यात अब्दुल खान सह अन्य तीन आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी नामंजूर केला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. पुणे येथील रहिवासी असलेला शौनक सकपाळ आणि त्याचा मित्र शंभूराजे देवकाते याचे 4 कोटी 75 लाख देणे लागत होता. सागर कारीवडेकर च्या सावंतवाडी येथील घरी शौनक आणि शंभूराजे देवकाते आपल्या मित्रांसह आले असता शौनक आणि देवकाते याच्या अंगावर कार घालून त्यांना ठोकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच कारवर दगड मारून काच फोडून कारचे नुकसान केले. ही घटना 26 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती.याबाबत फिर्यादी शौनक संकपाळ याने सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तहा राजगुरू, सागर कारीवडेकर सह एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी अब्दुल अबू खान ( रा. साटेली भेडशी ) , वामन गणपत मेस्त्री ( रा. चाफेआळी, वेंगुर्ले बेळगाव रोड सावंतवाडी ) तैशील शकील दरवाजकर ( रा. बांदा कट्टा, ता. सावंतवाडी ) तल्हा अंजुम राजगुरू ( रा. बांदा कट्टा, ता. सावंतवाडी ) यांनी जिल्हा न्यायालयात जामिनावर मुक्तता होण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जाच्या सुनावणी दरम्यान सरकारी वकील रुपेश देसाई यांनी चारही आरोपींचा जामीन नामंजूर होण्यासाठी युक्तिवाद करताना पुढील मुद्दे उपस्थित केले. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर कारीवडेकर आणि अज्ञात आरोपी हे दोघेही अद्याप फरार आहेत. त्यांचा ठावठिकाणा जामीन मंजुरीसाठी अर्ज दाखल केलेल्या आरोपीना माहीत आहे.त्यामुळे आरोपीना जामीन मंजूर झाल्यास ते फरार आरोपीना मदत करतील,आरोपींवर बांदा पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल असून जामीन मिळाल्यास ते आणखी गंभीर गुन्हे करू शकतील, गुन्ह्यातील साक्षीदार अशोक काकडे याच्या नातेवाईकांना धाक दाखवतील, साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता आहे, आरोपींचे कृत्य हे समाजातील कायदाप्रिय सर्वसामान्य व्यक्तींच्या भीती निर्माण करणारे आहे, आरोपीना जामीन मिळाल्यास समाजात वेगळा संदेश जाईल. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून वरील आरोपींचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश श्रीमती देशमुख यांनी फेटाळला आहे . त्यामुळे आरोपींच्या जेल मुक्कामात वाढ झाली आहे.











