कावी चित्रशैली अभ्यासक समृद्धी केरकर यांचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांनी निसर्ग सहलींमध्ये सहभागी होऊन निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करावा – पर्यावरण तज्ज्ञ राजेंद्र केरकर
कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रम आयोजित जीवन शिक्षण शाळा या नाविन्यपूर्ण उपक्रमात आज मुलांनी कोकणातील महत्त्वपूर्ण कावी कलेचे प्रशिक्षण घेतले. केरी साखळी गोवा येथील लेखिका, पर्यावरण अभ्यासक तथा कावी चित्रशैली अभ्यासक समृद्धी केरकर यांनी या कलेविषयी मुलांना मार्गदर्शन केले. याला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी समृद्धी केरकर यांचे वडील प्रसिद्ध गोमंतकीय पर्यावरणतज्ज्ञ राजेंद्र केरकर यांनीही पर्यावरण जागृतीविषयी संवाद साधून निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी निसर्ग सहलींमध्ये सहभागी होऊन निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करावा, असे आवाहन केले.

यावेळी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक उर्फ बाळू मेस्त्री, संचालिका अर्पिता मुंबरकर, संदीप सावंत, विनायक सापळे, चित्रकार नामनंद मोडक, वामन पंडित, प्रा. बाळकृष्ण गावडे, धीरज मेस्त्री, दर्शना पाताडे, सदाशिव राणे, नितीन तळेकर, सुरेखा वर्देकर, सनीश अवखळे, वेदांत केरकर, श्रेयश शिंदे, सहदेव पाटकर आदी उपस्थित होते.

या कावी आर्टस् प्रशिक्षणात १००हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात विद्यार्थ्यांनी जांभ्या मातीच्या रंगापासून कावी चित्रे रेखाटली. याबाबत समृद्धी केरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी कावी चित्रकलेचा इतिहासदेखील समृद्धी केरकर यांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितला.
राजेंद्र केरकर यांनी निसर्ग व पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी गोव्याच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या मदतीने विविध उपक्रम राबवत सरकारचे लक्ष वेधने गरजेचे असल्याचे सांगितले. निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करून खूप काही शिकण्यासारखे आहे. गोपुरी आश्रम सारख्या निसर्ग संपन्न भागाला विद्यार्थ्यांनी भेट देऊन निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले. गोपुरी हे सामाजिक परिवर्तन घडविणारे केंद्र असून गोपुरीचा वारसा पुढे नेण्याचे काम तरुण पिढीने करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शालेय विद्यार्थ्यांनी कोणतीही कला अवगत करून त्यामध्ये पारंगत झाले पाहिजे. गोपुरी आश्रमाच्या कावी आर्टस् कार्यशाळेमुळे भविष्यात निसर्ग व पर्यावरण संरक्षण करणारे कलाकार घडतील, असा विश्वास साहित्यिका पौर्णिमा केरकर यांनी व्यक्त केला. तसेच कणकवलीतील विद्यार्थ्यांसाठी गोव्यात निसर्ग दर्शन सहल काढली जाणार आहे. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना पाताडे यांनी केले तर आभार विनायक सापळे यांनी केले.













