अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मद्यपी चालकाचा जामीन नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद

ओरोस (प्रतिनिधी) : मद्यप्राशन करून भरधाव वेगात टेम्पोने ठोकून पादचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला टेम्पो चालक आरोपी पांडुरंग शिवाजी खोत (रा. बेळगाव) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी पांडुरंग शिवाजी खोत याने मद्यप्राशन करून टेम्पो चालवत स्वतःच्या ताब्यातील टेम्पोने पादचारी लालसाब दौलसाब खानापूर या पादचाऱ्याला ठोकरले होते. या अपघातात लालसाब मयत झाला होता. ही दुर्घटना 22 नोव्हेंबर, 2025 रोजी जामदारवाडी बाव तिठा या ठिकाणी घडली होती. या गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी पांडुरंग खोत याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्या अर्जाला सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली.

आरोपी पांडुरंग खोत याने दारूच्या नशेत गाडी चालवल्यास अपघात होऊन एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे माहीत असूनही दारू पिऊन टेम्पो चालवून पादचारी लालसाब खानापूर याला पाठीमागून ठोकरून त्याचा जीव घेतला आहे. जामीन मंजूर झाल्यास आरोपीला कायद्याचे भय राहणार नाही तसेच तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, गुन्हा गंभीर असून आरोपीला जामीन मंजूर झाल्यास जनतेत असंतोष निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, आरोपीला जामीन मिळाल्यास जनमाणसांत कायद्याविषयी गैरसमज निर्माण होऊन कायद्याचा आदर राहणार नाही आदी मुद्दे न्यायाधीशांसमोर मांडले. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्री. देशपांडे यांनी आरोपी पांडुरंग खोत याचा जामीन अर्ज नामंजूर केला.

error: Content is protected !!