हॅंडीकॅप अर्न अँड लर्न ट्रस्ट होम (हेल्प ) मुंबईतर्फे शालेय / जीवनोपयोगी साहित्य,ताडपत्रीचे वाटप
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त पावले — फोंडाघाट भाविकांची आढळत श्रद्धा !
दिव्यांगांसाठी लघुउद्योग, सांभाळ आणि शिक्षणाची सोय करण्याची इच्छा — रावराणे कुटुंबीय
फोंडाघाट (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी, समाजातील गरजू आणि होतकरू लोकांसाठी तसेच दिव्यांगांसाठी मोठे योगदान व उपयोगी उपक्रम हॅंडीकॅप अर्न अँड लर्न ट्रस्ट (हेल्प), मुंबई या रजिस्टर संस्थेकडून नेहमी आयोजित केले जातात. दरवर्षी श्रीदत्त जन्मोत्सवाचे औचित्य साधून, अवधूत रावराणे हे फोंडाघाट येथे हायस्कूल जवळ आपल्या मालकीच्या घरालगत उभारलेल्या श्रीगणेश- दत्त मंदिरामध्ये दत्त जयंती- जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा करतात. यावेळी सकाळी पूजाअर्चा,दुपारी भंडारा, भजन – कीर्तन, सायंकाळी दत्त जन्मोत्सव साजरा झाला. महिलांना हळदीकुंकू सह वाणभेट देण्यात आले..
दुसऱ्या दिवशी वैभववाडीचे नायब तहसीलदार दिलीप पाटील, संस्थेचे संचालक अवधूत रावराणे,अनिल दाभोळकर, गणेश गोडे,प्रशांत राणे,गीतांजली रावराणे, अनिता इंगळे यांचे उपस्थितीत दिव्यांग बंधू- भगिनींना ताडपत्री, जीवनश्यक वस्तू आणि हायस्कूलच्या मुलांना शालेय वस्तू, कंपास बॉक्सचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना दिलीप पाटील यांनी अवधूत राणे आणि त्यांच्या संस्था सहकाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, स्वतः शरीराने दिव्यांग असून सुद्धा, मनाने सुदृढता दाखवून, जिद्दीने कामासाठी व्यस्त राहणे ही सोपी गोष्ट नाही. कुटुंबातील दिव्यांगाना कुटुंबीयांनी आपण आणि समाजाने आधार देणे गरजेचे आहे. आज त्यांचे साठी मंत्रालयाची निर्मिती झाली आहे. विविध योजना त्यांचे साठी कार्यान्वित आहेत. दिव्यांगांसाठी जीवनाला दिशा देणारे प्रबोधन ऊर्जा देणारे आहे. त्यातून त्यांचा आत्मविश्वास वाढून व्यक्तिमत्व विकसित होते. आणि चांगले नागरिक घडू शकतात. आणि सुखदुःखाची देवाण-घेवाण होऊन आपलेपणाने जगण्याची जिद्द निर्माण होते…
यांच्या कार्यामुळे दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी दिव्यांगाना, शालेय मुलांना आणि गोरगरिबांना भेटवस्तूद्वारे अवधूत चिंतन गुरुदेव दत्त पावल्याची अढळ श्रद्धा-आनंद व्यक्त होत आहे.अवधूत राणे यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत येणाऱ्या मृदभाषी,सेवाभावी व्यक्तिमत्वामुळे या कार्यक्रमाला सुखद आनंद प्राप्त होतो,अशा भावना व्यक्त करून,दिव्यांगांचा सांभाळ, त्यांच्यासाठी लघुउद्योग, शिक्षणाची सेवा फोंडाघाट मध्ये उपलब्ध करणार असल्याची इच्छा व्यक्त केली. याच दिवशी फोंडा हायस्कूल, अर्जुन रावराणे हायस्कूल, वैभववाडी. सांगुळवाडी जिल्हा परिषद शाळा नंबर 1 या ठिकाणी सुद्धा शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेश टक्के, रिक्षा चालक धुरी व इस्वलकर, सुषमा लाड, तृप्ती सावंत आणि परिसरातील अनेक स्त्री-पुरुषांनी सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले….












