उगवाई नदीवर श्रमदानातून बंधाऱ्याची उभारणी
फोंडाघाट (प्रतिनिधी) : कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागाने पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उत्तरदायित्वाची सांगड घालत उगवाई नदीवर श्रमदानातून समाजोपयोगी बंधारा उभारण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागातून उभारलेला हा बंधारा जलसंधारण, भूजलपातळी वाढ, शेतीसाठी पाणीसाठा आणि गावाच्या शाश्वत विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या उपक्रमाचा आढावा घेताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी एनसीसी कॅडेट्सच्या कार्याचे कौतुक केले. तसेच डॉ. सतीश कामत आणि डॉ. बालाजी सुरवसे यांनीही विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवेचे अभिनंदन केले. एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. ताडेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पाण्याचे संवर्धन ही केवळ गरज नसून सामाजिक लढाई असल्याचे स्पष्ट सांगितले. उपक्रमाचे नियोजन, श्रमविभागणी, सुरक्षितता आणि पर्यावरणीय समतोल याचा प्रत्यय देत विद्यार्थ्यांनी एकत्रित कामातून नेतृत्वगुण, संघभावना आणि सेवाभाव दृढ केला.
या उपक्रमासाठी फोंडाघाट ग्रामपंचायतीने सहकार्य केले. सरपंच संजना संजय आग्रे यांनी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आणि ग्रामपंचायत कार्यालय व निलेश गोवेकर यांच्या माध्यमातून आवश्यक मदत उपलब्ध करून दिली. फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सिनियर अंडर कॅडेट ऑफिसर कॅडेट कोमल जोईल हिने सर्व मान्यवर, ग्रामपंचायत प्रतिनिधी, शिक्षकवृंद आणि सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.












