पुणे (प्रतिनिधी) : सर्व धर्मांचा समान आदर आणि सामाजिक न्यायाची मशाल उंचावणारे, कष्टकऱ्यांचे लाडके नेते डॉ. बाबासाहेब पांडुरंग आढाव (वय ९५) यांचे काल निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
गेल्या बारा दिवसांपासून त्यांना पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला ते उपचारांना प्रतिसाद देत होते; मात्र नंतर किडनी निकामी झाली. काल सकाळी ८.२५ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्यांचे निधन झाले.
आजपासून सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे पार्थिव ठेवून अंत्यदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत कोणतेही धार्मिक विधी न करता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
१ जून १९३० रोजी पुण्यात एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तीन महिन्यांचे असताना वडिलांचे निधन झाले आणि त्यानंतर ते आजोळी वाढले. १२व्या वर्षीच १९४२ मध्ये ते राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. साने गुरुजी, एस. एम. जोशी यांसारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय राहिले.
पंढरपूर मंदिर प्रवेश आंदोलनात साने गुरुजी यांना त्यांनी साथ दिली. पुढे आयुर्वेदिक शिक्षण पूर्ण करून नाना पेठेत १४ वर्षे क्लिनिक चालवले. मात्र, सामाजिक कार्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य अर्पण केले.
महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि गांधी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी असंघटित कामगारांसाठी मोठे आंदोलन छेडले. किंमती वाढ, विस्थापन, अन्यायाविरुद्ध सातत्याने लढा दिला. या प्रवासात त्यांना तब्बल ५३ वेळा तुरुंगवास झाला. १९६२ च्या आंदोलनात झालेल्या लाठीमारात त्यांचा एका डोळ्याचा दृष्टिदोष झाला.
हमाल पंचायतीची स्थापना हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अध्याय मानला जातो. ‘कष्टाची भाकर’ उपक्रमाला त्यांनी चालना दिली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, ‘एक गाव, एक पाणवठा’ उपक्रम, देवदासी निर्मूलन, मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांसारख्या विविध सामाजिक चळवळींमध्ये त्यांनी आघाडी घेतली.
वयाच्या ९५ व्या वर्षीही ‘जिंदाबाद’चा नारा देत ते शेवटपर्यंत संघर्षांमध्ये सक्रिय होते. शरीर थकलं, पण त्यांची जिद्द, उमेद आणि सामाजिक बांधिलकी कायमच प्रखर राहिली.
समाजहितासाठी आयुष्यभर झगडलेल्या या थोर नेत्याच्या जाण्याने राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.












