सिंधुदुर्गातील 18 हजार 371 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार नुकसानभरपाई
नागपूर (राजन चव्हाण) : चालू वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत लवकरात लवकर भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मात-नाचणी नुकसानीपोटी जिल्हयातील शेतकयांसाठी ४ कोटी ८६ लाख ९ हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
यावर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला, तरीही ऐन भात कापणीच्या हंगामातच सातत्याने पाऊस पडत होता. त्यामुळे कापलेल्या भाताला अंकुर येणे, उभ्या पिकाला अंकुर येणे यासारखे प्रकार घडले. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी भाताची कापणी करूनही त्याचा उपयोग न होता, भात कुजून जाण्याचा प्रकार घडला होता. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये झालेल्या या भात नुकसानीबाबत पंचनामे व सर्व प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा प्रशासनाकडून २८ नोव्हेंबर २०२५ रोजी शासनाकडे भरपाईसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार आता शासनाने ही भरपाई मंजूर केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयातील १८ हजार ३७१ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यात ४६३६.४७ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे म्हटले होते. त्यानुसार आता 4 कोटी 86 लाख ९ हजार रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबतची कार्यवाही होणार आहे.











