सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सन २०१० मध्ये एका ट्रक अपघातात सुदैवाने वाचलेली परंतु ढोपराखालील पाय कायमचा गमावलेल्या दीड वर्षाच्या निशा पालकर हिला मे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच ने दिलेल्या महत्वपूर्ण निर्णयाने नुकसान भरपाई म्हणून ३५, ३८, १५०/-रुपये दसादशे साडेसात टक्के दराने व्याजासह वसूल करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रक अपघातात झालेल्या दुखापतीमध्ये निशाला तिचा डावा पाय ढोपराखाली पूर्णपणे काढून टाकावा लागला त्यामुळे तिला कायमचे अपंगत्व आले. त्याबाबत नुकसान भरपाई मिळण्यासाठी निशाचे वडील यांनी सन २०१० मध्ये ऍड. दीपक अंधारी यांचे मार्फत मे. मोटर अपघात न्यायाधिकरण सिंधुदुर्ग येथे दावा अर्ज दाखल केला होता. त्याचा निर्णय समाधानकारक न लागल्याने अर्जदार तर्फे मे उच्च न्यायालय मुंबई येथे अपील दाखल करण्यात आले होते. त्याबाबतचे अपील कोल्हापुर येथील मे उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच समोर चौकशीसाठी येऊन लवकरात लवकर निकाली झाले त्यामुळे अर्जदार कुटुंबीयांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.
मे उच्च न्यायालय मुंबईचे सर्किट बेंच कोल्हापूर यांनी निर्णय देताना निशाच्या भवितव्याचा विचार करून, तिच्या कायमच्या अपंगत्वाचा विचार करून नुकसान भरपाईच्या रकमेत भरीव वाढ करून एकूण नुकसान भरपाई ३५,३८,१५०/- रुपये तसेच खटला दाखल केल्यापासून रक्कम वसूल होईपर्यंत दसादशे साडेसात टक्के दराने व्याज वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. एडवोकेट दीपक अंधारी यांनी विमा कंपनी विरुद्ध व्याजासह रक्कम रुपये ७१,४५,०००/- वसूल करण्यासाठी मोटर अपघात न्यायाधीकरण सिंधुदुर्ग येथे वसुलीची दरखास्त दाखल केली आहे.











