सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : आपल्या ताब्यातील कार अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी तल्हा अंजुम राजगुरू ( रा. बांदा कट्टा, ता. सावंतवाडी ) याचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी फेटाळला. सरकार पक्षाचे वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. शौनक संकपाळ ( रा.पुणे ) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी तल्हा राजगुरू याने स्वतःच्या ताब्यातील कारने फिर्यादी संकपाळ व त्याचा मित्र असलेला साक्षीदार अशोक काकडे यांना ठोकर देऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना 26 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास सर्वोदयनगर सावंतवाडी येथे सागर कारीवडेकर याच्या बंगल्याजवळ घडली होती. या गुन्ह्यात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी तल्हा राजगुरू याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज सादर केला होता. या अर्जाला हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे मांडले. आरोपी तल्हा राजगुरू याने स्वतःच्या ताब्यातील कारने फिर्यादी शौनक संकपाळ आणि त्याचा मित्र अशोक उर्फ विजय काकडे यांना ठोकर देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात जखमी झालेला अशोक काकडेवर पुणे येथे रुग्णालयात उपचार करण्यात आले असून काकडे याला गंभिर दुखापत झाल्याचे मेडिकल सर्टीफिकेट आहे.गुन्ह्यातील मुख्य आरोपी सागर कारीवडेकर हा अन्य आरोपींसह फरार असून आरोपी तल्हा याला जामीन मिळाल्यास तो ह्या आरोपीना मदत करू शकतो, आरोपी तल्हा याच्यावर बांदा पोलीस ठाण्यात यापूर्वीही मारामारी चा गुन्हा दाखल असून त्याला जामीन मिळाल्यास तो आणखी गंभीर गुन्हा करू शकतो,तसेच साक्षीदारांवर दबाव आणून त्यांना सत्य हकीकत सांगण्यापासून परावृत्त करू शकतो. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीशांनी आरोपी तल्हा राजगुरू याचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आरोपी राजगुरू याचा जेलमुक्काम आणखी वाढला आहे.












