वेंगुर्ले नगराध्यक्षपदी दिलीप उर्फ राजन गिरप विजयी; भाजपाचा स्पष्ट बहुमतासह झेंडा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप यांनी ४३० मतांनी दणदणीत विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली आहे. या विजयामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवले असून शहराच्या राजकारणात भाजपाचे वर्चस्व अधोरेखित झाले आहे.

या निवडणुकीत एकूण २० नगरसेवक पदांच्या जागांपैकी भाजपाने १५ जागांवर विजय मिळवला आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ४ जागा, तसेच शिवसेनेला १ जागा मिळाली आहे. निवडणूक निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

मतमोजणी प्रक्रिया कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. सुरुवातीपासूनच दिलीप उर्फ राजन गिरप यांनी आघाडी घेतली होती आणि शेवटपर्यंत ती कायम राखत त्यांनी विजय निश्चित केला. या निकालाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते.

विजयानंतर दिलीप उर्फ राजन गिरप यांनी वेंगुर्लेकर मतदारांचे आभार मानत, “शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार केला जाईल. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, पर्यटन विकास आणि मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात येईल,” असे सांगितले.

या निकालामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेत आगामी काळात भाजपाच्या नेतृत्वाखाली स्थिर आणि विकासाभिमुख प्रशासन कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!