मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने आपले निर्भेळ वर्चस्व सिद्ध करत पालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या उमेदवार ममता वराडकर यांनी सुमारे १००० मतांच्या भरघोस फरकाने विजय मिळवत भाजप व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला आहे.
मालवण नगरपरिषदेतील १९ नगरसेवक पदांच्या जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेला स्पष्ट कौल दिला. निकालानुसार शिवसेनेने १० जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. त्यामुळे आगामी काळात मालवण नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता असणार आहे.

या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ५ जागा, तर ठाकरे शिवसेनेला ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हा विजय मिळवला असून, मालवण नगरपरिषदेत पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे.
ममता वराडकर यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी मालवण शहरात मोठा जल्लोष केला. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि जल्लोषी घोषणा देत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. विजयाबद्दल बोलताना ममता वराडकर यांनी मतदारांचे आभार मानत, “मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख कारभार केला जाईल. नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि पर्यटन विकासाला प्राधान्य दिले जाईल,” असे सांगितले.
या निकालामुळे मालवणच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.










