समाजातील निराधार बांधवांच्या सेवेतून मनस्वी समाधान – शैलेंद्र कदम
खारेपाटण (प्रतिनिधी) : “जीवन आनंद संस्थेच्या माध्यमातून रस्त्यावरील निराधार, वंचित, वयोवृद्ध तसेच शारीरिक व मानसिक आजारांनी ग्रस्त बांधवांच्या पुनर्वसनासाठी सुरू असलेल्या सेवाकार्यात सहभागी होण्यामुळे जीवनात एक मनस्वी समाधान मिळते”, असे भावपूर्ण उदगार जीवन आनंद संस्थेचे स्वयंसेवक शैलेंद्र कदम यांनी संस्थेच्या वतीने ओपा खांडेपार व माँ आसोरेघर आश्रमात गोवा मुक्ती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना काढले.
यावेळी प्रमुख अतिथी शैलेंद्र कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्र ध्वजारोहणाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी ते उपस्थितांना संबोधित करत होते. जीवन आनंद संस्था ही रस्त्यावरील निराधार वंचित बांधवांचे पुनर्वसन करून त्यांना सन्मानाचे मानवी जीवन मिळवून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. तर शैलेंद्र कदम हे सुरुवातीपासूनच संस्थेच्या कार्याशी परिचित असून गेल्या वर्षभराहून अधिक काळ आश्रम शेल्टर होममधील विविध व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या स्वेच्छेने पार पाडत असून, संस्थेच्या सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेत आहेत. तसेच आश्रमातील कार्य अनुभवातून त्यांनी समाजातील वंचितांच्या सेवेसाठी आजीवन कार्य करण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे, आश्रमातील सेवा कार्यकर्ती पल्लवी सलामे तसेच आश्रमातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.










