खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने कणकवली तालुक्यातील शिवडाव येथे घेण्यात आलेल्या कणकवली तालुकास्तरीय शालेय बाल, कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव स्पर्धेत खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेत निवड झाली आहे. कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या भव्य पटांगणावर मंगळावर दि. २३ डिसेंबर, २०२५ रोजी संपन्न झालेल्या कणकवली तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत खारेपाटण जि.प. केंद्रशाळेच्या अथर्व प्रमोद लाड या विद्यार्थ्याने मोठा गट मुलगे – लांब उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला असून वैष्णवी स्वप्नील निमणकर या विद्यार्थीनीने देखील लहान गट मुली – उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. या दोन्ही विद्यार्थ्याची पुढील होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली असून या दोन्ही विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत खारेपाटण केंद्र शाळेच्या या दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केल्याबद्दल खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर व उपसरपंच महेंद्र गुरव, ग्रा.पं. सदस्य गुरुप्रसाद शिंदे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तर कणकवली तालुका गटशिक्षण अधिकारी किशोर गवस तळेरे प्रभाग शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र नारकर, खारेपाटण केंद्राचे प्रमुख गोपाळ जाधव, संजय पवार, खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष प्राप्ती कट्टी, माजी अध्यक्ष संतोष पाटणकर, उपाध्यक्ष प्रियंका गुरव, समिती सदस्य मंगेश ब्रम्हदंडे, संध्या पोरे, केंद्र शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी अभिनंदन केले आहे.










