सुदैवाने कोणालाही दुखापत नाही..
वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुंद रस्त्यामुळे समोरून येणाऱ्या मानव विकास एसटी बसला साईड देताना कणकवली मौदे एस टी बस गटारात कलंडली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. ही घटना शुक्रवारी सकाळी ९. ३० वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघाताने मौदे डाळकोंड ते गुरववाडी दरम्यान असलेल्या अरुंद रस्त्याचा प्रश्न समोर आला. ग्रामस्थांकडून वेळोवेळी रस्त्याचा रुंदीकरण व नूतनीकरणाची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रस्त्याचे नूतनीकरण करावे.अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
आखवणे गुरववाडीहुन मानव विकासची एस बस विद्यार्थ्यांना घेऊन वैभववाडीकडे येत होती. या दरम्यान कणकवली मौदे ही एसटी बस आखवणे गुरववाडी येथे आली असता, समोरून येणाऱ्या एसटी बसला साईड देताना बस गटारात कलंडून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आखवणे गुरववाडी येथील ग्रामस्थांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने गटारात गेलेली एसटी बस गटारातून बाहेर काढली. त्यानंतर ती बस मार्गस्थ करण्यात आली. मौद डाळ कोंड ते आखवणे गुरववाडी दरम्यान रस्ता अरुंद व खड्डेमय झाला आहे. या अरुंद व खराब रस्त्यामुळे अगोदरही छोटे मोठे अपघात घडले आहेत. या रस्त्याचे नूतनीकरण करावे. अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे.










