मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कट्टा, कुमामे-नागिंदेवाडी येथील रहिवासी तथा जय जवान सुरक्षा रक्षक सहकारी संस्था, सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष अमोल नारायण रावले (वय ५६) यांचे रविवारी (दि. १२ जुलै) सायंकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुरक्षा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
अमोल रावले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी व जावई असा परिवार आहे. सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी ओमकार रावले यांचे ते वडील होत.
गुरामवाडी येथील जय जवान सुरक्षा रक्षक सहकारी संस्था, सिंधुदुर्गच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील बँका, शासकीय कार्यालये, पतसंस्था तसेच विविध सार्वजनिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी सुरक्षा रक्षक उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. आपल्या कर्तव्यनिष्ठ नेतृत्वामुळे आणि संस्थेच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले.
अमोल रावले यांचा प्रेमळ, मनमिळावू आणि मदतीस तत्पर स्वभाव सर्वांनाच आपलासा वाटत होता. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवारही मोठा होता. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार आणि त्यांना ओळखणाऱ्या प्रत्येकाच्या मनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. १३ जुलै) सकाळी त्यांच्या मूळ गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.











