डेगवेतील शाळांची नितीन राऊळ यांच्याकडून पाहणी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

धोकादायक शाळा इमारतीच्या तातडीच्या दुरुस्तीचे आदेश; अंगणवाडीतील चिमुकल्यांच्या सुरक्षिततेबाबत व्यक्त केली चिंता

बांदा (प्रतिनिधी) : डेगवे मोयझरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर कोसळल्याच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य तथा जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांनी डेगवे गावातील शाळा व अंगणवाडी इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या पाहणीदरम्यान आंबेखणवाडी येथील बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ चे छप्पर अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. तरी देखील त्याच शाळेत अंगणवाडी घेतली जात असल्याचे निदर्शनास आले. त्या मुलांची योग्यती सोय होणे आवश्यक असल्यामुळे या इमारतीच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आदेश त्यांनी संबंधिताना दिले. नितीन राऊळ यांनी सांगितले की, मोयझरवाडीतील घटना अत्यंत गंभीर असून अशा प्रकारची दुर्घटना पुन्हा कुठेही घडू नये, यासाठी प्रत्येक शाळेची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. आंबेखणवाडी शाळेच्या धोकादायक इमारतीत अंगणवाडीतील तब्बल चार लहान मुले शिक्षण घेत असल्याने ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोयझरवाडी येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ च्या दुरुस्तीसाठीही आपण प्रयत्नशील असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले असल्याची माहिती त्यांनी दिली. आवश्यक निधी उपलब्ध करून शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी नितीन राऊळ यांनी डेगवे ग्रामसेवकांकडून गावातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. गावातील प्रलंबित व आवश्यक कामांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी बाजारवाडी येथील जिल्हा परिषद शाळेलाही भेट देऊन इमारतीची पाहणी केली व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्याचे निर्देश दिले.

error: Content is protected !!