जि.प सदस्य प्राची ईसवलकर व माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी वीज अभियंताना विचारला जाब
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शहर व आजूबाजूच्या दशक्रोशीत वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा तसेच येथे असलेला अपुरा वीज कर्मचारी वर्ग आदी विविध साध्याबाबत खारेपाटण मतदार संघाच्या जि.प.सदस्या प्राची ईसवलकर व खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी सोमवार दि.१३ जुलै २०२६ रोजी खारेपाटण येथील कनिष्ठ वीज अभियंता कार्यालयाला भेट देऊन येथील अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य किरण कर्ले, बूथ अध्यक्ष विजय सावंत, लक्ष्मण गुरव आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खारेपाटण रामेश्वर नगर येथील म.रा.विद्युत पारेषण कंपनी कार्यालयातील विज अभियंता सकपाळ यांनी वीज समस्या बाबत पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी खारेपाटण विभागासाठी १४ कर्मचारी वर्गाची गरज असताना फक्त ८ कर्मचारी वर्गावर कामकाज चालवले जात आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थित कमी कर्मचारी वर्गामुळे विजेचा खोळंबा होतो. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले.
तर जि.प.सदस्य प्राची ईसवलकर यांनी वीज दुरुस्ती आणि विद्युत कामकाजाच्या नावावर वारंवार खंडित करण्यात येणार वीज पुरवठा थांबविण्यात यावा व ग्राहकांचे पावसाळ्यात नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी.तसेच आपत्कालीन परिस्थिती येथील होत असलेले शहरी वजा नागरीकरण पाहता खारेपाटण गावासाठी तातडीने दोन स्वतंत्र पुरुष वायरमन यांची नियुक्ती करण्यात यावी. अशी मागणी केली. दरम्यान अभियंता श्री. सकपाळ यांनी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत खारेपाटण गाव तसेच दशक्रोशीतील वारंवार वीज जाणार याची दक्षता घेतली जाईल असे सांगितले. तर अपुऱ्या कर्मचारी वर्गाबाबत वरिष्ठांना कळविण्यात येईल असे सांगितले.












