संवाद परिवार आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने पाचव्या स्मृती दिनाचे आयोजन
तळेरे(प्रतिनिधी) : जेष्ठ कवी सुरेश भटांचे पहिल्या फळीतील शिष्य आणि माझ्या गझलांना वेगळी ओळख निर्माण करून देण्यात ज्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्यामुळेच माझ्या गझला अधिक समृध्द झाल्या. स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या सरळ सोप्या भाषेतील गझला आणि कवितांनी रसिकांच्या पसंतीस उतरायच्या आणि त्यांना भरभरून प्रतिसाद मिळायचा. हेच त्यांचे वैशिष्ट्य व वेगळेपण होते. मला त्यांचा साहित्य क्षेत्रातील पाच वर्षांचा सहवास लाभला. त्यांच्या स्वभावातील आणि भाषेतील मधुरपणा कविता तसेच गझलांमध्ये नेहमीच जाणवत होता. काव्य म्हणजे हरणीच्या डोळ्यातील व्याकूळ भाव ते अचुक टिपत होते. सगळे कसे रोजच्या जगण्यातले अनुभव, सहजता, सुंदरता कवीतेत दिसून यायची. आता पर्यंत मला मिळालेले सगळे पुरस्कार नानिवडेकर यांना समर्पित करत आहे. स्व.मधुसूदन नानिवडेकर यांच्या वारसा जपणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे भावोद्गार प्रसिद्ध कवयित्री आणि गझलकार सौ. माधुरी चव्हाण- जोशी यांनी काढले.
संवाद परिवार आणि तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ कवी, गझलकार, लेखक, पत्रकार स्व. मधुसूदन नानिवडेकर यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथील दळवी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या “मधुस्मृती” या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ मालवणी कवी दादा मडकईकर, गोव्यातील साहित्यिक व कवयित्री डॉ.अनुजा जोशी, राजापूर येथील साहित्यिक व सरकारी वकील भालचंद्र सुपेकर, संवाद परिवाराचे संस्थापक डॉ. मिलिंद कुलकर्णी, तळेरे सरपंच हनुमंत तळेकर, माजी सरपंच चंद्रकांत तळेकर, शशांक तळेकर, कवी प्रमोद कोयंडे आदी उपस्थित होते.
तत्पूर्वी तळेरे येथील मधुकट्टयावरती स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी पुढे बोलताना माधुरी चव्हाण जोशी म्हणाल्या की, नानिवडेकर यांना कोणताही अहंकार नव्हता. नवोदित कवींना ते स्वतः फोन करून उत्तम मार्गदर्शन करायचे. गझल कशी हवी याविषयी ते नेहमी सांगायचे. त्यांनी दिलेली शिदोरी जपायची आहे. करते थोडी स्वप्ने गोळा…माझा गझले बद्दल….हरकत नाही आदी नानिवडेकर यांच्या आणि स्वतःच्या गझला यावेळी सादर करून त्यांच्या अनेक आठवणी जागविल्या.
खास गोव्याहून या कार्यक्रमासाठी आलेल्या कवयित्री डॉ.अनुजा जोशी म्हणाल्या की, मधुसूदन नानिवडेकर यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृती जपणारं गाव म्हणजे तळेरे आहे. ते या गावात रमले आणि स्थिरावले होते. सुरेश भटांचा मानसपुत्र म्हणून कौतुकाची थाप त्यांना मिळाली होती. पण त्यांनी कधीच त्या गोष्टीचा गाजावाजा केला नाही. कधी कुणाला न दुखवता ते नेहमीच सरळ, साधं आयुष्य जगले. त्यांचा सहवास मला लहानपणापासून आमच्या खारेपाटण गावात बाबांच्या ओळखीमुळे लाभला होता. येथील लोकांनी त्यांना आपले मानले होते. नानिवडेकर हे या मातीतील महत्वाचं अनमोल रत्न होते. म्हणूनच या मातीचा वसा आपण जपला पाहिजे. या मातीत गुणवत्ता दडलेली आहे. यासह त्यांच्या विषयीच्या अनेक आठवणी जागविल्या. तसेच तळेरे गावाने त्यांच्या चिरंतन स्मृती जपण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून संवाद परिवाराच्या माध्यमातून साहित्यिक चळवळ उभी केली आहे ही गोष्ट निश्चितच वाखाणण्याजोगे आहे असं मत व्यक्त केले. त्याचबरोबर पाऊस येतो....पाऊस मला भेटायला उत्सुक...मी घरघरच्या अडचणीत छत्रीच्या शोधात...राधा आणि कृष्णाचं महात्म्य....त्यांनी सोसलेल्या संघर्ष...ती कोण आहे? आदी कविता त्यांनी सादर केल्या. आणि त्यांची आठवण म्हणून ही तुझी कुंडली सांगते नेमके...प्रेम डबगाईला आले तरी चालवू महामंडळासारखे...ही गझल सादर केली. तसेच मालवणी कवी दादा मडकईकर यांनी मालवणी कविता सादर केल्या. तर सरकारी वकील भालचंद्र सुपेकर यांनी एका छत्रीत प्रवास ही कविता सादर केली. तसेच कवी, गझलकार प्रमोद कोयंडे नानिवडेकर यांची भलतेसलते सांगतेस का उगाच भांडतेस ही गझल सादर केली. तसेच राजू जठार आणि उदय दुधवडकर यांनी आपल्या कविता सादर केल्या.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन जेष्ठ साहित्यिक प्रसाद घाणेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाला दळवी महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक तसेच संवाद परिवाराचे सभासद, साहित्यप्रेमी उपस्थित होते.
फोटो:-

१) तळेरे येथील मधुकट्टयावरती मधुसूदन नानिवडेकर यांना अभिवादन करताना मान्यवर.

२) मधुस्मृती कार्यक्रमात बोलताना माधुरी जोशी-चव्हाण, शेजारी डाॅ.अनुजा जोशी व इतर

३) मधुस्मृती कार्यक्रमात बोलताना डाॅ.अनुजा जोशी शेजारी माधुरी जोशी-चव्हाण व इतर












