राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक; मालवाहू वाहनासह मुद्देमाल जप्त
ओरोस (प्रतिनिधी) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे ओव्हरब्रिज येथे केलेल्या कारवाईत १ कोटी ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा अवैध परराज्यातील मद्यसाठा, मालवाहू वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजस्थानातील वाहनचालकाला ताब्यात घेऊन महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने १२ जुलै रोजी पहाटे सुमारे ३ वाजता गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाची तपासणी केली. तपासणीत वाहनामध्ये गोव्यातून आणण्यात येणाऱ्या ‘रॉयल ब्ल्यू’ ब्रँडच्या विदेशी मद्याच्या प्रत्येकी २४ निप असलेल्या १०५ बॉक्स आढळून आले.
या कारवाईत ८९ लाख २२ हजार ४०० रुपयांचे विदेशी मद्य, २० लाख रुपयांचे अल्ट्रा टी-46 मॉडेलचे मालवाहू वाहन आणि १० हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण १ कोटी ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी मनोहर उदाराम लाल (वय ३२, रा. पानोरिया, ता. चौहटन, जि. बाडमेर, राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले असून महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक अमित पाडळकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक सुरेश पाटील, सुरेश भंडारे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सम्राट ठाकूर तसेच जवान रजनीत शिंदे, श्रेयेश शेटये, किरण पाटील, रवी जानकर आणि प्रविण भोसले यांनी केली. पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर करीत आहेत.











