“आरोग्य हा जनतेचा मूलभूत अधिकार…” – अशोक जाधव

खारेपाटण (प्रतिनिधी) : “महाराष्ट्रामध्ये खाजगीकरणाच्या नावाखाली शासनाची संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली असून गरिबातल्या गरीब रुग्णाला विविध आजारांचे उपचार घेणे अवघड होऊन पडले आहे. त्यामुळे आरोग्य हा जनतेचा मूलभूत अधिकार असून सरकारने तो मान्य न केल्यास राज्यव्यापी जन आंदोलन करण्यात येईल”, असा इशारा म्युनिसिपल मजदुर युनियन मुंबईचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी महाराष्ट्र कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती व जन आरोग्य अभियान यांच्या पुढाकाराने मुंबई येथे घेण्यात आलेल्या राज्यव्यापी आरोग्य अधिकार परिषद मध्ये मार्गदर्शन करताना सरकारला दिला.

रविवार दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी म्युनसिपल मजदुर युनियनच्या बाळ दंडवते स्मृती कार्यालय ना. म. जोशी मार्ग मुंबई येथे संघटनेचे सचिव वामन काविस्कर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या राज्यव्यापी आरोग्य अधिकार परिषदेला महाराष्ट्रातून डॉ. डी. एल. कराड, डॉ. शुक्ला, त्रिशिला कांबळे, म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, डॉ. गिरीश भावे, दिवाकर दळवी, प्रदीप नारकर, डॉ. अभिलाष, डॉ. अविनाश, श्री. पुजारी, रमेश देशमुख-भुतेकर आदी मान्यवरांनी उपस्थित राहून या परिषदेला अनमोल असे मार्गदर्शन केले.
या परिषदेमध्ये सन २०२६-२७ या वर्षांकरिता सरकारने आरोग्य सेवेवर किमान अडीज हजार कोटी रुपयांची तरतूद करावी तसेच महाराष्ट्रातील सर्व जनतेला आरोग्य सेवा मोफत मिळावी, अशी मागणी युनियनचे नेते अशोक जाधव यांनी केली. तर लवकरच महाराष्ट्र कामगार कर्मचारी संयुक्त कृती समिती व जन आरोग्य अभियानाच्या वतीने याबाबत शासनाच्या सहा महसूली विभागात मेळावे घेण्यात येणार असून शासनाचे अधिक लक्ष वेधून घेण्यासाठी ठाणे ते मंत्रालय असा लाँगमार्च देखील काढण्यात येणार असल्याची माहिती यावेळी श्री. जाधव यांनी सहकाऱ्यांच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकाद्वारे दिली असल्याचे यावेळी सांगितले.
या आरोग्य परिषदेमध्ये सरकारी अथवा नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील एकही रुग्णालयाचे खाजगीकरण करू नये. तसेच महापालिका निवडणूक तोंडावर असून प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या उमेदवारांच्या जाहीरनाम्यात महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे, असा स्पष्ट उल्लेख करावा व जो पक्ष आपल्या जाहीरनाम्यात जनतेला मोफत आरोग्य सेवा देण्याचा उल्लेख करणार नाही त्या पक्षाचा व उमेदवाराचा नागरिक निवडणुकीत निश्चित विचार करतील असा गर्भित इशारा देखील यावेळी अशोक जाधव,डी. एल. कराड, त्रिशिला कांबळे व वामन कविस्कर यांनी दिला आहे.











