वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाला दोन नवीन डॉक्टर; पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणखी दोन नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून डॉक्टरांच्या रिक्त जागा भरल्या गेल्याने रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून, तालुकावासीयांकडून पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

डॉ. गणेश मर्ढेकर आणि डॉ. अमित कदम हे दोन वैद्यकीय अधिकारी नव्याने वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात रुजू झाले आहेत. यापूर्वी ते गेली दोन वर्षे शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होते.वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागांमुळे रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. पुरेशा आरोग्य सेवेअभावी नागरिकांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. अखेर या प्रयत्नांना यश आले असून दोन नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची संख्या आता चार झाली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. व्ही. पोटे, डॉ. वैभव मोरे यांच्यासह डॉ. गणेश मर्ढेकर आणि डॉ. अमित कदम हे चारही डॉक्टर पूर्णवेळ रुग्णसेवेसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेत आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

दरम्यान, पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, ताप अंगावर काढू नये आणि कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. व्ही. पोटे यांनी केले आहे.

error: Content is protected !!