बांदा (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील डेगवे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक २ चे छप्पर सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटना दिवसा घडली असती तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सदर शाळा भारतीय जनता पक्षाचे बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई तसेच माजी सरपंच प्रवीण देसाई यांच्या प्रभागात येते. शाळेत सध्या केवळ एक विद्यार्थी शिक्षण घेत असून नियमित शैक्षणिक कामकाज सुरू आहे. मात्र छप्पर कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. शाळेची इमारत धोकादायक झाल्याने विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती पर्यायी व्यवस्था करून इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून नव्याने दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील जुन्या आणि जीर्ण झालेल्या शालेय इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला असून शिक्षण विभागाने तातडीने सर्व शाळांची संरचनात्मक तपासणी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. याबाबत आपण मुंबईला कामानिमित्त आलो आहे आपण जिल्हा परिषद सदस्य व शिक्षण समिती सदस्य या नात्याने हा प्रश्न जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कानावर घातला आहे असे नितीन राऊळ यांनी सांगितले असून या बाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे















