मनसेच्या प्रसाद गावडे यांची पत्र मागणी
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्रशासनाने पशु पक्षी प्रदर्शन व योजनांची जत्रा कार्यक्रम ६ ते ९ मे या कालावधीत घेण्याचा घाट घातला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजित कालावधी बाबत पुनर्विचार करावा अशी मागणी मनसेच्या प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धि पत्रकाद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ६ ते ९ मे या भर उन्हाळ्याच्या कालावधीत होऊ घातलेल्या शासकीय योजनांची जत्रा आणि कृषी व पशु पक्षी प्रदर्शन कार्यक्रमाच्या नियोजित कालावधीत बदल करावा अशी मागणी कुडाळ मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केली आहे. सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यभरात वाढलेला उष्मा पाहता कार्यक्रमाच्या नियोजित कालावधीत बदल करण्याची आवश्यकता आहे. ग्रीष्म ऋतू उष्णतेच्या अत्युच्च शिखरावर असताना ६ ते ९ मे या कालावधीत पशु-पक्षांना वाढलेला उष्माघात सोसणारा आहे का ? योजनांची जत्रा व मांडलेले प्रदर्शन पाहता लोकांची झुंबड उडणार असून त्यात खारघर सारखी दुर्दैवी घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे एकीकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने नेमके कोणते निकष डोळ्यासमोर ठेवून सदर कार्यक्रमाचे नियोजन केले आहे हे साशंकित राहिले आहे. तर दुसरीकडे प्रशासन शासनाचा निधी निव्वळ खर्ची घालण्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन भर उष्णतेच्या कालावधीत करत आहे का ?असाही प्रश्न उपस्थित होत आहे. याशिवाय ७५ हजार लाभार्थ्यांच्या वैयक्तीत लाभाची निवडपत्रे व प्रत्यक्ष लाभ ३१ मार्च पूर्वी देणे आवश्यक असताना प्रशासनाने फक्त योजनांचा बाजार मांडण्यासाठी ऐन उन्हातान्हात सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी लाभ निवडपत्र देण्याचा खटाटोप चालविला आहे. असेच भासत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासक म्हणून काम पाहणाऱ्या श्री प्रजित नायर यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्यक्रमाच्या नियोजित कालावधीत बदल करवा आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात कार्यक्रम नियोजित करून पशु पक्षी व जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी केली आहे.