राष्ट्रीय कला उत्सवात देशात अव्वल; खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची भव्य विजयी मिरवणूक

ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले जंगी स्वागत

खारेपाटण (प्रतिनिधी) : शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने दि. २० ते २३ डिसेंबर या कालावधीत यशदा, बाणेर रोड, पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कला उत्सव २०२५ मध्ये शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व ज्युनिअर कॉलेज खारेपाटण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी देशामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल नुकतेच या सर्व विद्यार्थ्यांची व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांची भव्य विजयी मिरवणूक खारेपाटण शहरात काढण्यात आली. सिंधुदुर्गसह महाराष्ट्र राज्याच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा रोवणाऱ्या खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर पार पडलेल्या या कला उत्सव स्पर्धेत एकूण बारा कलाप्रकार समाविष्ट असलेल्या या स्पर्धेत लोकसंगीत समूह वाद्यवादन या कला प्रकारात खारेपाटण हायस्कूलच्या संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट सादरीकरण करून राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

या कलाउत्सवामध्ये प्रशालेतील आर्या मोसमकर, आयुष मांगले, सुमित ठोसर, वंश कानडे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना संगीत विभाग प्रमुख संदीप पेंडुरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांच्या दैदिप्यमान यशाचे कौतुक करण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण व ग्रामस्थांच्या वतीने विजयी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक, शिक्षक यांची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी विद्यार्थ्यांचे सत्कार व स्वागत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उतुंग यशाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, प्रशालेचे आजी – माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. या मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!