दहीवडी सातारा येथील सर्वसाधारण सभेत राज्य कार्यकारिणी घोषित
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : अम्यच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सचिवपदी नाशिकच्या भारती जगताप यांची निवड करण्यात आली. कबड्डी खेळास प्रभावी नेतृत्व मिळाल्याने खेळाच्या विस्ताराला नवी दिशा आणि चालना मिळणार असल्याची भावना क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
अम्यच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या कार्यकारिणीची बैठक दहिवडी, जि. सातारा येथे नुकतीच पार पडली. अम्यच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूकीसाठी निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.व्ही. रायते, यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम केले. सहा. निवडणूक निर्णय ऍड. श्रद्धा कुलकर्णी निरीक्षक म्हणून छाया प्रकाश राव यांनी काम पाहिले.
निवडलेली नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. अम्यच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणूकीवेळी वरीष्ठ उपाध्यक्ष सपना वाघमोडे, उपाध्यक्ष विजय संतान, विवेक कोल्हे, दर्शिल कोटक, संजय पाटील, तर सरचिटणीपदी नाशिकच्या भारती जगताप यांची निवड झाली आहे. तर खजिनदार बाळासाहेब जाधव, सहचिटणीस ज्ञानेश काळे, गोकुळ तांदळे, अजय देशमुख, राजेंद्र राऊत, कार्यकारणी सदस्यपदी – अशोक देवकर, श्रीकांत परांडकर, जगजित खुराना यांची निवड करण्यात आली.

यावेळी प्रशिक्षक, पंच यांचेसाठी उदबोधन वर्ग आणि पंच परीक्षा आयोजन करावी. ग्रामीण भागातील गुणवान कबड्डी खेळाडूंचा शोध घेणे व विकास, कबड्डी लीग स्पर्धा आयोजित करणे, डोपिंग विषयी जनजागृती आदी विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. नवनियुक्त महाराष्ट्र राज्य पदाधिकाऱ्यांचे जागतिक कबड्डी महासंघाचे अध्यक्ष डॉ. अशोक दास, महासचिव ऍड. ए. उशी रेड्डी, आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, आ. मंगेश चव्हाण, कबड्डी प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. बैठकीत सहसचिव ज्ञानेश काळे यांनी प्रास्ताविक केले.
शिस्तबद्ध, सक्षम व देशाभिमानी पिढी निर्माण करणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट –
आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणे हा संकल्प, ग्रामीण व शहरी भागातील होतकरू खेळाडूंना समान संधी, पारदर्शक व्यवस्था, दर्जेदार स्पर्धा व सुरक्षित भविष्य देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे. ज्युनियर, सब-ज्युनियर व युवक स्तरावर सातत्यपूर्ण स्पर्धा, प्रशिक्षक व पंच प्रशिक्षण, तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडवणे हा आमचा ठाम संकल्प आहे. कबड्डीच्या माध्यमातून शिस्तबद्ध, सक्षम व देशाभिमानी पिढी निर्माण करणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट आहे, असे अम्यच्यूअर कबड्डी फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्र राज्य चे नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश महाजन यांनी सांगितले.
याप्रसंगी सरचिटणीस भारती जगताप, सहसचिव ज्ञानेश काळे, उपाध्यक्ष सपना वाघमोडे, विजय संतान यांच्यासह अन्य मान्यवर विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन आणि प्रास्ताविक ज्ञानेश काळे यांनी तर शेवटी उपाध्यक्षा सपना वाघमोडे यांनी आभार मानून सर्वसाधारण सभेची सांगता केली. या सर्वसाधारण सभेला सिंधुदुर्ग जिल्हा अमॅच्यूअर कबड्डी असोसिएशन मार्फत प्रतिनिधी दत्तात्रय मारकड व अभिजीत शेट्ये तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.










