रस्त्यालगतच्या दुकानांमध्ये शिरली कार; एटीएमसह स्टॉल्स उद्ध्वस्त
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव बॅलेनो कारने अक्षरशः धुमाकूळ घातल्याची घटना घडली. या अपघातात बाजारातील स्टॉल्स, रस्त्यावर उभी असलेली वाहने तसेच एका एटीएम केंद्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुदैवाने ही घटना मध्यरात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री कुडाळ बाजारपेठेतून भरधाव वेगाने जाणारी बॅलेनो कार अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये घुसली. या धडकेत रस्त्यावरील अनेक स्टॉल्स चिरडले गेले. तसेच कारने एका एटीएम केंद्रालाही जोराची धडक दिल्याने एटीएम मशीन व केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे.

कुडाळ बाजारपेठ ही दिवसभर गजबजलेली असते. मात्र हा अपघात मध्यरात्री घडल्याने मोठी दुर्घटना टळली. हीच घटना दिवसा घडली असती, तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होण्याची शक्यता होती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या अपघातात स्टॉलधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रस्त्यावर उभी असलेली काही वाहनेही या धडकेत क्षतिग्रस्त झाली आहेत. अपघाताची माहिती मिळताच कुडाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.
दरम्यान, संबंधित कार चालकाची ओळख, वाहनाचा वेग, चालकाने मद्यपान केले होते का, यासह अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास कुडाळ पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनेचा सखोल तपास सुरू असून या अपघाताबाबत शहरात विविध चर्चा सुरू आहेत.










