आचरा (प्रतिनिधी) : जगप्रसिध्द एज्युकेशनल ॲडव्हायजर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांना पुणे येथील फाउंडेशन फॉर एज्युकेशन अँड कम्युनिटी वेल्फेअर यांच्याकडून देण्यात येणारा राज्यस्तरीय ज्ञानदीप उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा 2 जानेवारी 2026 रोजी पुणे येथे होणार आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सदाशिव पांचाळ हे २००३ पासून शिक्षक नसतानाही शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, अमरावती, सातारा, कोल्हापूर अशा अनेक जिल्ह्यांत जाऊन विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले आहे. लॉकडाऊन नंतर ऑनलाईन पध्दतीने दुबई, मलेशिया, सिंगापूर, दोहा, कतार, अबुधाबी, नेदरलँड, साऊदी अरेबीया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंग्लंड अशा विविध देशांतील लोकांना मार्गदर्शन केले आहे.
आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून सदाशिव पांचाळ यांनी पाढ्यांची कार्यशाळा या उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत एक लाख पेक्षा अधिक मुलांना विनामूल्य मार्गदर्शन करत जगाच्या कानाकोपऱ्यात नावलौकीक मिळवले आहे. त्यांचा बुध्दिबळ हा मुलांच्या बौध्दिक क्षमता विकसित करणारा कार्यक्रम आज खुप चालतो आहे. यात विद्यार्थी आणि पालक यांचा समावेश तर असतोच, पण या कार्यक्रमाचे कौतुक अनेक डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर तसेच अमेरिकेत विविध विषयांचे पेटंट असलेले वैज्ञानिक अतुल नाईक यांनीही केले आहे. सदाशिव पांचाळ यांना यापुर्वीही विविध संस्थांनी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविले आहे.










