मालवण (प्रतिनिधी) : गेले दीड महिना रिक्त असलेल्या मालवण तहसीलदार पदावर गणेश दादासो लव्हे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मंगळवारी दुपारी अधिकृतपणे तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारला.
मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे यांना मुंबई शहर उपजिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी ११ नोव्हेंबर, २०२५ रोजी तहसीलदार पदाचा पदभार सोडला होता. त्यानंतर गेले दीड महिना हे पद प्रभारी अधिकाऱ्यांकडे होते. शासनाच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी–मलकापूर तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार सांभाळत असलेल्या गणेश लव्हे यांची मालवण तहसीलदारपदी बदली व पदोन्नती करण्यात आली आहे.
श्री. लव्हे यांनी यापूर्वी मंगळवेढा येथे नायब तहसीलदार म्हणून तसेच सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ते प्रशासकीय सेवेसाठी दाखल झाले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर विविध सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी तसेच नागरिकांनी श्री. लव्हे यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.










