खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण या शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांचा १६ वा स्मृतिदिन. खारेपाटण हायस्कूल येथे दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांचे व शाळेचे माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. प्रारंभी खारेपाटण हायकुलच्या प्रांगणातील गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर यांच्या अर्धपुतळ्याला माजी विद्यार्थी श्रीकृष्ण पाटणकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्व शालेय विद्यार्थी शाळेचे माजी विद्यार्थी पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व संस्था विश्वस्त यांच्या वतीने गुरुवर्य शंकरराव पेंढारकर यांना सामूहिक मानवंदना देण्यात आली. तर गुरुवर्य पेंढारकर यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे श्रमगीत प्रशालेतील संगीत विभागाने यावेळी सादर केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने सरांच्या कार्याचा परिचय व सरांविषयीच्या आठवणी अभिवादनातून व्यक्त करण्यात आल्या.या कार्यक्रमाचे औचित्य साधून खारेपाटण हायस्कूलच्या संगीत विभागाने कला उत्सव स्पर्धेमध्ये समूह वाद्य प्रकारात देशात प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला त्याबद्दल सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्रीकृष्ण पाटणकर यांनी या अतुलनीय कामगिरी बद्दल संगीत विभागासाठी रोख ११०००/- रुपयाची देणगी देत शाळेच्या प्रगती विषयी समाधान व्यक्त केले. तर श्रीकृष्ण पाटणकर यांनी प्रशालेला देखील रोख ५१०००/- हजार रुपयांची स्वतंत्र देणगी संस्थेकडे सुपूर्द केली. ” गुरुवर्य शंकरराव पेंढारकर यांनी निर्माण केलेल्या या खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या रोपट्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. सरांचा हा वारसा आपण सर्वांनी जपला पाहिजे. असे भावपूर्ण उदगार यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी मार्गदर्शन करताना काढले. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, सर्व विश्वस्त, तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी उदय दुधवडकर, श्रीकृष्ण पाटणकर, सौ. पाटणकर, विजय देसाई, नंदकिशोर कोरगावकर, श्रीमती धुमाळे, खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे, खारेपाटण हायस्कूलचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.















