सरपंच वेदिका नाईक यांच्या हस्ते रस्ते कामांचे भूमिपूजन; ग्रामस्थांना दिलासा
बांदा (प्रतिनिधी) : तांबुळी येथील ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. गावातील मुख्य रस्ता ते टेंबवाडी आणि मुख्य रस्ता ते स्मशानभूमी या दोन्ही महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामाचे भूमिपूजन सरपंच वेदिका नाईक यांच्या हस्ते पार पडले. या विकासकामामुळे परिसरातील दळणवळणाचा मोठा प्रश्न सुटणार असून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली होती. पावसाळ्यात रस्त्यावर चिखल व्हायचा, तर इतर वेळी धुळीमुळे नागरिक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्यांमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी वारंवार रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली होती. अखेर या कामाला मुहूर्त मिळाल्याने स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी सरपंच वेदिका नाईक म्हणाल्या की, गावाच्या विकासात रस्त्यांचे महत्त्व मोठे आहे. या कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला भाजपा बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, उपाध्यक्ष गुरु कल्याणकर, उपसरपंच जगदीश सावंत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.










